सध्याचा टप्पा कोविडच्या समुह संसर्गाचा : डॉ. शेखर राजदेरकर

जयसिंग कुंभार
Monday, 14 September 2020

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कम्युनिटी संसर्ग सुरु झाला असून मात्र आपली वाटचाल समुह प्रतिकार क्षमतेकडे सुरु झाली आहे असे सध्या तरी म्हणता येत नाही असे मत मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या कम्युनिटी मेडीसीन विभागाचे प्रमुख डॉ.शेखर राजदेरकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.

सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा कम्युनिटी संसर्ग सुरु झाला असून मात्र आपली वाटचाल समुह प्रतिकार क्षमतेकडे सुरु झाली आहे असे सध्या तरी म्हणता येत नाही असे मत मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या कम्युनिटी मेडीसीन विभागाचे प्रमुख डॉ.शेखर राजदेरकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. डॉ.राजदेरकर कोरोनासाठीच्या विभागीय टास्क फोर्सचेही सदस्य आहेत. 

ते म्हणाले,"" रुग्णाच्या संसर्गाचा पुर्वेइतिहासच स्पष्ट होत नाही हे समुह संसर्गाचे प्रथम लक्षण आहे. अर्थात रुग्णसंख्या, मृत्यूसंख्या, आणि त्याची नेमकी कारणे असे मुद्देही महत्वाचे आहेत. महामारीत समुह संसर्गानंतर समुह प्रतिकार क्षमतेचा टप्पा येतो. एखाद्या जनसमुदायात लोकच रोगाचा प्रसार रोखू लागतात तेव्हा रोगाचा प्रतिकार होऊ शकतो. सध्याच्या स्थितीत किती लोकांना कोविड-19 चे संक्रमण झाले त्या आधारे ही समूह प्रतिकार शक्ती मोजता येईल. एखाद्या व्यक्‍तीमध्ये नैसर्गिकपणे आणि लोकांमध्ये औषधांच्या सेवनामुळे रोगाच्या विरोधातील प्रतिकारक्षमता उत्पन्न होते.

खूप मोठ्या प्रमाणावर रोगाचा फैलाव झालेला असतो, तेव्हा व्यापक समूह प्रतिकार क्षमता समुदायामध्ये आपोआपच उत्पन्न होते. त्यातून फैलाव रोखला जातो. संसर्गाची साखळी तोडली जाऊ शकते. या समुह प्रतिकार क्षमतेचे मोजमाप करण्यासाठी वय, सामाजिक संलग्नता या आधारे गणितीय मांडणी केली जाते. त्या आधारे कोणामध्ये ही प्रतिकारक्षमता निर्माण होते आणि सामूहिक प्रतिकारशक्‍तीचा अंदाज वर्तवला जाऊ शकतो. मात्र सध्या याबाबतचे पाश्‍चात्य संशोधकांचे अंदाजही कोलमडले आहेत. ठराविक लोकसंख्येला समप्रमाणात औषध दिल्यानेही ही प्रतिकारक्षमता दिसते.

मात्र कोविडसंदर्भात वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना संसर्ग झाल्याने ही समूह प्रतिकारक्षमता वाढलेली नाही, असे त्या संशोधकांचे मत आहे. आपल्याकडे अद्याप त्यादिशेने फारसे संशोधनच झालेले नाही. त्यामुळे आत्ता आपल्याकडे हर्ड इम्युनिटी किंवा समुह प्रतिकार क्षमता आली आहे का याबद्दल भाष्य करता येणार नाही. '' 

काळजी घ्या; काळजी करु नका ! 
श्री राजदेरकर म्हणाले,"" कोरोनाबद्दल दोन प्रकारच्या सामाजिक मानसिकता दिसतात. एक वर्ग अनावश्‍यक भितीने दडपून गेला आहे तर दुसरा रोग फैलावाची फिकीरच करीत नाही. त्यामुळे मृत्यूदर वाढतो आहे. योग्य वैद्यकीय व्यवस्थापनाची गरज आहे. डॉक्‍टर्संनी एकमेकांच्या अनुभवाची देवाणघेवाण केली पाहिजे. ती होतेच आहे. त्याचवेळी ती माहिती गावातील डॉक्‍टर्संपर्यंत पोहचली पाहिजे. समाजातील सर्वांनाच ती माहिती मिळायला हवी. स्वाईन फ्लु, डेंगी, एचआयव्ही प्रमाणेच व्यापक प्रबोधनाची गरज असून लोकांनी भिती सोडून वास्तवाचा स्विकार करीत दक्षता घेतली पाहिजे.''

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Current stage of Kovid's group infection: Dr. Shekhar Rajderkar