सायबर लॅबला पोलिस ठाण्याचा दर्जा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

पोलिस आयुक्तालय आणि पोलिस अधीक्षक क्षेत्रात सायबर पोलिस ठाणी कार्यरत असतील. सायबर लॅबमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या जबाबदारीतही वाढ होईल. सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
- बाळसिंग रजपूत, अधीक्षक, सायबर क्राइम विभाग, महाराष्ट्र

सोलापूर - सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या गृह विभागाने राज्यात सर्वत्र सायबर लॅब सुरू केले आहेत. अनेक गुन्ह्यांच्या तपासात सायबर लॅबमधील तज्ज्ञ पथकाची मदत होत असून, आता सर्व सायबर लॅबना पोलिस ठाण्याचा दर्जा देण्यात आला आहे. सोलापूरसह राज्यात 47 ठिकाणी सायबर पोलिस ठाणी स्थापन करण्यात येणार आहेत.

राज्यातील सायबर गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 ऑगस्टपासून राज्यात 43 हून अधिक सायबर लॅब सुरू केले आहेत. विशेष प्रशिक्षण दिलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती लॅबमध्ये करण्यात आली आहे. पूर्वीचा सायबर सेल आता लॅब म्हणून कार्यरत आहे. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या सायबर लॅबमधून अनेक गुन्हे उघडकीस येत आहेत. सोशल मीडिया, इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या सर्वच गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवणे, गुन्हा दाखल करून त्याचा तपास करणे, हे माध्यम कसे वापरावे याबाबत लोकांचे प्रबोधन करण्यासाठी शासनाने 15 नोव्हेंबर 2016 पासून राज्यात सायबर लॅबची सुरवात केली आहे.

सायबर लॅबच्या स्थापनेनंतर तीनच महिन्यांत गृह विभागाने सायबर लॅबला पोलिस ठाण्याचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला असून, गेल्या महिन्यात 15 नोव्हेंबर रोजी सायबर पोलिस ठाण्याविषयी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. सायबर पोलिस ठाण्याचे कार्यक्षेत्र शहर आणि जिल्हा याप्रमाणे असेल. शहरात किंवा ग्रामीण भागात कोणताही सायबरविषयक गुन्हा घडला, तर त्या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिस ठाण्याकडे देण्यात येणार आहे. राज्यात सध्या 43 सायबर पोलिस ठाणी कार्यरत आहेत. लवकरच ही संख्या 47 वर जाणार आहे. मुंबईत पाच सायबर पोलिस ठाणी कार्यरत आहेत. सोलापूर पोलिस आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्याची जबाबदारी सहायक पोलिस निरीक्षक नितीन खाडगे यांच्याकडे, तर ग्रामीण विभागाच्या सायबर पोलिस ठाण्याची जबाबदारी सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्याकडे आहे.

Web Title: Cyber lab police station level