'चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर दगडफोड्याही खासदार होऊ शकतो'

अभय जोशी
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

चहावाला आपल्या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर मग सर्वांची साथ असेल तर माझ्यासारखा दगडफोड्या ही निश्चित खासदार होऊ शकतो, असा विश्वास पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष दगडू घोडके यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

पंढरपूरः चहावाला आपल्या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो तर मग सर्वांची साथ असेल तर माझ्यासारखा दगडफोड्या ही निश्चित खासदार होऊ शकतो, असा विश्वास पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष दगडू घोडके यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

कोणत्या पक्षाकडून किंवा आघाडीकडून निवडणूक लढवायची हे अजून निश्चित केलेले नाही. मतदारांशी चर्चा करून त्या विषयीचा निर्णय घेणार असल्याचे देखील घोडके यांनी स्पष्ट केले. पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून 1999 ला अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेले घोडके गेल्या काही वर्षापासून राजकारणापासून अलिप्त होते. आज त्यांनी अचानक पत्रकार परिषद घेऊन आगामी लोकसभा निवडणूक सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लढवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला.

घोडके म्हणाले, आपण सध्या कोणत्याही पक्षात नाही कोणताही पक्ष अथवा आघाडीशी आपला संबंध नाही आपल्याला सर्व पक्ष सारखेच आहेत सर्वच पक्षातील नेते आणि प्रमुख पदाधिकारी यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख नेत्यांशी आपल्या गाठीभेटी सुरू असून आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे असे त्यांनी सांगितले.

घोडके पुढे म्हणाले की, 1999 सालच्या निवडणुकीत आपल्याला जवळपास एक लाख मते मिळाली होती. मागील लोकसभा निवडणूक देखील आपण लढवणार होतो परंतु त्याचवेळी आपल्या भावाचे निधन  झाल्याने निवडणूक लढवू शकलो नव्हतो. गेली काही वर्षे आपण राजकारणापासून काहीसे अलिप्त होतो परंतु आपले समाज कार्य सुरूच होते. कर्नाटकातील भोई समाजाचा आपला जन्म दाखला आहे. केवळ वडार समाजाचा नव्हे तर सर्वच समाजाचा आपल्याला पाठिंबा आवश्यक आहे. विद्यमान खासदार शरद बनसोडे यांचे मतदारसंघाकडे दुर्लक्ष असल्याच्या तक्रारी असल्याने यावेळी आपण निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

घोडके सुमारे पंधरा वर्षे नगरसेवक होते. 1996- 97 मध्ये नगराध्यक्षपदाची त्यांना संधी मिळाली होती आणि बांधकाम क्षेत्रातील मोठे ठेकेदार म्हणून त्यांची ओळख होती. आता आपण पूर्णवेळ समाजकार्याला वाहून घेतले असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी पंढरपूरचे माजी नगरसेवक संजय अभ्यंकर उपस्थित होते.

Web Title: Dagdu Ghodke Will Contest Loksabha Election