दाजीपूर अभयारण्य 'या' तारखेपासून खुले 

मोहन नेवडे
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

हत्ती महाल येथील फुलपाखरू उद्यान परिपूर्ण झाल्याने ते ही यंदाच्या पर्यटन हंगामात पर्यटकांचे आकर्षण स्थळ ठरणार आहे. तर खासगी रिसॉर्टमुळे ही पर्यटकांच्या साठीच्या पायाभूत सुविधांचे वानवा कमी झाला आहे.

राधानगरी ( कोल्हापूर ) - जागतिक वारसा स्थळाचे कोंदण लाभलेले आणि जैवविविधतेने संपन्न दाजीपूर अभयारण्य सरत्या वर्षाच्या अखेरच्या महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक डिसेंबरला पर्यटकांसाठी खुले होणार आहे.

दरवर्षी 1 नोव्हेंबरला हे अभयारण्य पर्यटकांसाठी खुले होत होते, पण यंदा पाऊस लांबल्याने अभयारण्य खुले होण्यास तब्बल महिनाभराचा उशीर झाला आहे. त्यातच अतिवृष्टीने अभयारण्य क्षेत्रातील जवळपास 21 किलोमीटरच्या अंतर्गत रस्त्याची दुरवस्था झाली. परतीचा पाऊस अधिक काळ सुरू राहिल्याने रस्त्याच्या डागडुजी वेळीच करण्यात अडसर आला होता. आता रस्त्याच्या डागडुजीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे . रस्ता सुस्थितीत वाहतूक योग्य बनल्याने अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्याचे नियोजन वन्यजीव विभागाने केले आहे. 

हेही वाचा - सह्याद्रीत सापडले दुर्मिळ प्रजातीचे फुलपाखरू 

दरम्यान, हत्ती महाल येथील फुलपाखरू उद्यान परिपूर्ण झाल्याने ते ही यंदाच्या पर्यटन हंगामात पर्यटकांचे आकर्षण स्थळ ठरणार आहे. तर खासगी रिसॉर्टमुळे ही पर्यटकांच्या साठीच्या पायाभूत सुविधांचे वानवा कमी झाला आहे. एकूणच अभयारण्य क्षेत्रात पर्यटन विकासाच्या योजनांची अंमलबजावणी व पायाभूत सुविधा वाढत असल्याने आगामी काळात अभयारण्य क्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत अधिकच भर पडण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा - बाॅम्बस्फोटाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी ती रमली चित्रशैलीत 

माफक शुल्कात निवासव्यवस्था 

दोन वर्षात निसर्ग पर्यटन योजनेतून अभयारण्य क्षेत्रात पर्यटनदृष्ट्या केलेल्या कामामुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. हत्तीमहाल येथे पर्यटकांच्या निवास व्यवस्थेसाठी उभारण्यात येणाऱ्या डोरमेटरी आणि विश्रामगृहाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या दोन्ही सुविधा आगामी दोन-तीन महिन्यात पर्यटकांसाठी उपलब्ध होणार आहेत. पर्यटकांना माफक शुल्कात खात्रीची व सुरक्षित निवासव्यवस्था मिळणार आहे. तर दाजीपुरातील प्रस्तावित एम्पी थिएटर उभारणीच्या कामाला ही लवकरच प्रारंभ होणार आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dajipur Sanctuary Open From One December