पाया खचल्याने बंधाऱ्यालाच धोका!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

दहिवडीत माण नदीवरील स्थिती; दोन्ही बाजूंनी बंधारा मोकळा, पाणी वाहून जात असल्याने कुचकामी    
दहिवडी - येथील माण नदीवर असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा पाया मोठ्या प्रमाणावर खचला असून त्यातील दगड व काँक्रिट निसटल्याने बंधाऱ्यालाच धोका निर्माण झाला आहे. त्यातच पाणी पायाखालून वाहून जात असल्याने हा बंधारा कुचकामी ठरला आहे. संबंधित खात्याने त्वरित लक्ष देत या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 

माण नदीपात्रात दहा वर्षांपूर्वी राज्य शासन अंगीकृत जिहे-कटापूर उपसा जलसिंचन पाटबंधारे प्रकल्पांतर्गत सुमारे ३५ लाख रुपये खर्च करून कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्याला सुमारे २२ दरवाजे आहेत. संपूर्ण बंधारा पूर्ण झाल्यावर पावसाळ्यात माण नदीला अचानक पूर आला. बंधाऱ्यात पहिल्या पाण्याचा साठाही झाला. मात्र, पाणी पायातूनच वाहून गेले.

खडकच गेला वाहून
बंधारा बांधलेल्या ठिकाणी माण नदीचे पात्र खडकाळ आहे. खडकांना मोठ्या प्रमाणावर भेगाही पडल्या आहेत. पाण्याच्या प्रवाहाने खडक वाहून गेल्याने बंधाऱ्याचा पूर्ण पायाच मोकळा झाला आहे. बंधाऱ्याचा पाया उत्तर बाजूच्या दिशेने खचू लागला आहे. एका बाजूने सुमारे ३० ते ४० फूट लांब आणि दोन फूट उंच असा पाया निघून गेल्याने बंधाऱ्याचे नुकसान झाले आहे. बंधाऱ्यात पाणीसाठाच होत नसल्याने या ठिकाणच्या लाभक्षेत्रातील लोकांना त्याचा उपयोग होत नाही. ठेकेदाराने आतील बाजूने पाया मोकळा करून ठेवला आहे. दोन्ही बाजूने बंधारा मोकळा झाला आहे. 

पायाखालून जाते पाणी
या ठिकाणच्या लोखंडी फळ्या टाकून दरवाजे बंद करावे लागतात. मात्र, पृष्ठभागातील खडक व काँक्रिट वाहून गेल्याने पाणीसाठा होत नाही. बंधाऱ्याच्या दरवाजात पाणी न अडता पायातूनच पाणी निघून जाते. परिणामी बंधारा कोरडा ठणठणीत आहे. एवढा मोठा बंधारा असूनसुद्धा पाणी आल्यावर दोन दिवस पाणी साठत नाही. प्रत्येक वेळी फळ्या चोरीला जातात. देखभाल, दुरुस्ती कधी होणार, याकडे स्थानिकांचे लक्ष आहे. या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल लाभधारक विचारत आहेत. बंधारा वाहून गेल्यावर देखभाल, दुरुस्ती होणार का? असा प्रश्न जनता विचारत आहे.

दहा वर्षांपूर्वी माण नदीवर झालेला जाधववस्ती शेजारील बंधारा कुचकामी असून तो सध्या दुरुस्त करणे गरजेचे आहे. दुरुस्त केला तरच त्याचा उपयोग होईल, अन्यथा बंधारा फक्त कागदावरच राहील.
- अशोक जाधव, दहिवडी

Web Title: dam danger in dahiwadi