सोलापूर शहरात 219 इमारती धोकादायक

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 2 जून 2018

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील धोकादायक इमारतींचे फेरसर्वेक्षण करण्यात येत आहे. शहरात सध्या २१९ इमारती धोकादायक आहेत. अशा इमारत मालकाना पालिकेच्या वतीने नोटिसा बजावण्यात येत आहेत. नागरिकांनी धोकादायक इमारतीत राहू नये. धोकादायक इमारतीची माहिती त्वरित पालिकेला कळवावी. 
- रामचंद्र पेंटर, सहायक अभियंता महापालिका

सोलापूर : शहरातील धोकादायक इमारतींचे फेरसर्वेक्षण महापालिकेने सुरू केल्याची माहिती बांधकाम विभागाचे सहायक अभियंता रामचंद्र पेंटर यांनी दिली. 

शहरात अनेक ठिकाणच्या धोकादायक इमारतींत राहणाऱ्या रहिवाशी तसेच आसपासच्या रहिवाशांना इमारतीपासून धोका होऊ शकतो. विशेष करून पावसाळ्यात अशा इमारती कोसळण्याच्या सर्वाधिक घटना घडतात. यामुळे मनपाने पावसाळापूर्व खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील धोकादायक इमारतींच्या फेरसर्वेक्षणास सुरवात केली आहे. तीन आठवड्यांत सर्वेक्षण पूर्ण होणार असून त्यानंतर अशा इमारतींचा नेमका आकडा कळणार आहे. 

जानेवारी 15 ते जानेवारी 18 या तीन वर्षांत एकूण 236 धोकादायक इमारतींना नोटिसा बजाविण्यात आल्या. महाराष्ट्र महापालिका अधिनियम 264 व 268 नुसार या नोटिसा देण्यात आल्या. यापैकी कलम 264 ही धोकादायक इमारतीची डागडुजी वा मजबुतीकरणासंदर्भात तर 268 हे कलम धोकादायक इमारत राहण्यास अयोग्य असल्याने त्याचे पाडकाम करावे याबाबत आहे. तीन वर्षांत 219 इमारतींना कलम 264 तर 17 इमारतींना कलम 268ची नोटीस देण्यात आली आहे. गत तीन वर्षांत आठ धोकादायक इमारती मनपाने पडल्या आहेत. दोन इमारती अंशत: पाडण्यात आल्या तर स्वत:हून डागडुजी-मजबुतीकरण केलेल्या इमारतींची संख्या तीन आहे. पाडकाम केलेल्या इमारतींची एकूण संख्या 17 आहे. फेरसर्वेक्षणात जास्त धोकादायक आढळणाऱ्या इमारतींच्या मालकांना पुन्हा नोटिसा बजाविण्यात येणार आहे. न्यायालयात वाद असलेल्या धोकादायक इमारतींबाबत मनपाकडून न्यायालयात प्रतिज्ञापत्र देऊन ते बांधकाम पाडण्यास संमती घेणार आहे. 

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील धोकादायक इमारतींचे फेरसर्वेक्षण करण्यात येत आहे. शहरात सध्या २१९ इमारती धोकादायक आहेत. अशा इमारत मालकाना पालिकेच्या वतीने नोटिसा बजावण्यात येत आहेत. नागरिकांनी धोकादायक इमारतीत राहू नये. धोकादायक इमारतीची माहिती त्वरित पालिकेला कळवावी. 
- रामचंद्र पेंटर, सहायक अभियंता महापालिका

Web Title: dangerous buildings in Solapur