दसरा चौकात आवाज मराठ्यांचाच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - ‘एक मराठा - लाख मराठा’च्या घोषणेने आज पुन्हा एकदा दसरा चौक दणाणून गेला. ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ असाही घोषणेचा सूर होता. रास्ता रोकोचा प्रयत्न करणाऱ्या स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले.

कोल्हापूर - ‘एक मराठा - लाख मराठा’च्या घोषणेने आज पुन्हा एकदा दसरा चौक दणाणून गेला. ‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’ असाही घोषणेचा सूर होता. रास्ता रोकोचा प्रयत्न करणाऱ्या स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांना ताब्यात घेतले.

१५ ऑक्‍टोबरच्या विराट अशा मराठा क्रांती मोर्चाचा समारोप याच चौकात झाला होता. कोपर्डी येथील घटनेमुळे संतप्त झालेला मराठा बांधव लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला होता. राज्यभर चक्का जाम आंदोलनाची हाक देण्यात आल्यानंतर कोल्हापुरातही त्यासंबंधीचा निर्णय झाला. मात्र रास्ता रोकोऐवजी ठिय्या आंदोलनाचा निर्णय एक गटाने घेतला. त्यानुसार सकाळी अकराच्या सुमारास समाजाचे कार्यकर्ते एकत्रित आले. तत्पूर्वी सकाळी दहापासूनच मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. रास्ता रोको आंदोलन झालेच तर ताब्यात घेण्याची तयारी पोलिसांनी केली होती. त्यानुसार पोलिस गाड्या तैनात होत्या. चौकातून वाहतूक मोठ्या प्रमाणावर असल्याने पोलिसांनी सकाळपासूनच वाहतुकीची कोंडी होणार नाही याची काळजी घेतली. 

अकराच्या सुमारास कार्यकर्ते मोठ्या संख्येने घोषणा देत चौकात आले. राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलनास सुरवात झाली. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही, कुणाच्या बापाचे’, ‘शेतमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे’, ‘कोल्हापुरात खंडपीठ झालेच पाहिजे’ अशा घोषणा सुरू झाल्या. अचानक रास्ता रोको होऊ नये यासाठी पोलिस दक्ष होते. साक्षी पन्हाळकर, अंकिता मोरे, ऋतुजा मोरे, शिवानी शिंदे, शिवानी जाधव, प्राजक्ता बागल, कोमल मिठारी या रणरागिणींनी मराठा मोर्चावेळी आक्रमणापणा दाखवून दिला होता. त्यांच्यासह चारुलता चव्हाण, चारुलता पाटील, जयश्री जाधव, सुवर्णा मिठारी, लता जगताप, सुनीता पाटील या भगिनीही आंदोलनात सहभागी झाल्या.

एकीकडे घोषणा सुरू असताना दुसऱ्या बाजूला स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अचानक घोषणा देत रास्ता रोकोचा प्रयत्न केला. साखळी करणाच्या आत पोलिसांनी कडे करून ताब्यात घेतले. कार्यकर्त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. ‘आरक्षण आमच्या हक्काचे’ अशा घोषणा दिल्या. त्यांना ताब्यात घेऊन पोलिस निघून गेले. थोड्या वेळाने ठिय्या आंदोलनाची सांगता झाली. दुपारी एकच्या सुमारास आंदोलन संपले तरी पोलिस बंदोबस्त कायम होता. क्रांती मोर्चानंतर चळवळ पुढे जाते की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला होता.

काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल, शिवसेना प्रजासत्ताक सामाजिक संस्था, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, कॉमन मॅन, क्षत्रिय मराठा रियासत, छावा संघटना, फायर कॉलेजचे विद्याथी, क्रीडा संघटना कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी झाले. बाबा पार्टे, दिलीप देसाई, बजरंग शेलार, फत्तेसिंह सावंत, उत्तम कोराणे, अजित राऊत, दिलीप पाटील, जयेश कदम, राजू लिंग्रस, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार,  सुरेश कुऱ्हाडे, शिरीष भोसले,सचिन आवणे, स्वप्नील पार्टे आदी आंदोलनात सहभागी झाले.

Web Title: Dasara chowk kolhapur