शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याची शनिवारी निवडणूक 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

शिरोळ - येथील श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. येत्या शनिवारी (ता. 27) कार्यक्षेत्रातील शिरोळ, हातकणंगले, कागल, करवीर, चिक्‍कोडी व अथणी या 5 तालुक्‍यातील 27090 मतदार, मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत.

शिरोळ - येथील श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रशासनाने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. येत्या शनिवारी (ता. 27) कार्यक्षेत्रातील शिरोळ, हातकणंगले, कागल, करवीर, चिक्‍कोडी व अथणी या 5 तालुक्‍यातील 27090 मतदार, मतदानाचा हक्‍क बजावणार आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 5 यावेळेत 62 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी 425 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

शिंगटे म्हणाले, ""उत्पादक गटातून 19, आणि बिगर उत्पादक सभासद व संस्था गटातून 2 जागांसाठी शनिवारी मतदान होत आहे. कारखाना कार्यस्थळावरील जनरल ऑफिसची पार्किंग जागा, केंद्रीय विद्या मंदिर, सांस्कृतिक हॉल, केंद्रीय प्राथमिक शाळा व दत्त पॉलिटेक्‍नीक कॉलेज येथील 62 केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रत्येक केंद्रावर 5 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केली असून, पोलिस बंदोबस्तासह 425 कर्मचारी अधिकारी, कार्यरत राहणार आहेत. निवडणूक कर्मचाऱ्यांना सहायक निवडणूक अधिकारी गजानन गुरव, व एल. एस. माळी यांनी मतदान प्रक्रियेबाबतचे प्रशिक्षण दिले आहे.'' 

मतदानासाठी सभासदांनी कारखान्याच्या ओळखपत्राबरोबरच, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड यापैकी एक पुरावा सोबत आणणे गरजेचे आहे. 28 जुलैला सकाळी आठ वाजता शुगर हाउस मध्ये 40 टेबलवरती मतमोजणी केली जाईल. याकरीता प्रत्येक टेबलसाठी 3 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती केल्याची माहिती शिंगटे यांनी दिली. 

दृष्टिक्षेपात मतदान प्रक्रिया 

  • कार्यक्षेत्र - शिरोळ, हातकणंगले, कागल, करवीर, चिक्‍कोडी व अथणी तालुके 
  • 27090 मतदार 
  • 62 मतदान केंद्रांवर मतदान 
  • 425 कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती 
  • मतदानासाठी कारखाना ओळखपत्र, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, पॅनकार्ड यापैकी एक पुरावा 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Datta Sugar Factory Shirol election