कळंबा कारागृह अधीक्षकपदी 'यांची' नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 December 2019

शेळके गेल्या तीन वर्षांपासून कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक आहेत. कारागृहातील न्यायालयीन बंदी संतोष पोळ याच्या पिस्तूल हातात घेऊन व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर त्यांची याआधी एकदा बदली झाली होती; पण त्यानंतर चौकशीत क्‍लीन चिट मिळाल्यानंतर ते पुन्हा कळंबा कारागृहात रुजू झाले 
होते.

कोल्हापूर - कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांची तडकाफडकी तुरुंगाधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय येरवडा येथे बदली झाली. त्यांच्या जागी विसापूर खुले कारागृहाचे अधीक्षक दत्तात्रय गावडे यांची नियुक्ती झाली. त्यांनी पदाची सूत्रे हाती घेतली. कारागृहाच्या सुरक्षेवर भर देणार असल्याचे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

शेळके गेल्या तीन वर्षांपासून कळंबा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक आहेत. कारागृहातील न्यायालयीन बंदी संतोष पोळ याच्या पिस्तूल हातात घेऊन व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर त्यांची याआधी एकदा बदली झाली होती; पण त्यानंतर चौकशीत क्‍लीन चिट मिळाल्यानंतर ते पुन्हा कळंबा कारागृहात रुजू झाले 
होते. दरम्यान, काल त्यांची तडकाफडकी येरवडा प्रशिक्षण महाविद्यालयात बदली करण्यात आली. तसेच कारागृहातील तुरुंगाधिकारी एच. एस. जाधवर यांची बिंदू चौक सबजेलला बदली झाली. विसापूर (नगर) येथील खुले कारागृह अधीक्षक दत्तात्रय गावडे यांची येथे नियुक्ती झाली. त्यांनी पदाची सूत्रे हाती घेतली. 

हेही वाचा - धक्कादायक ! अधिकारीच करतात गुन्हेगारांना मदत ? 

गावडे यांचा अल्प परिचय

गावडे मूळचे बरड (ता. फलटण, जि. सातारा) येथील आहेत. त्यांचे बीएस्सी ॲग्रीपर्यंतचे शिक्षण कोल्हापुरात झाले. ते १७ फेब्रुवारी १९९२ मध्ये कारागृह विभागात रुजू झाले. त्यांनी आपल्या कार्याची सुरवात आर्थररोड जेल येथून केली. त्यांनी पुणे येरवडा, ठाणे येथे कर्तव्य बजावले आहे. त्यांनी २००९-१० मध्ये कळंबा कारागृहात वरिष्ठ तुरुंगाधिकारी म्हणून कर्तव्य बजावले. त्यानंतर त्यांची नगर व तेथून विसापूर खुल्या कारागृहात बदली झाली. येथे अधीक्षकपदाची धुरा सांभाळताना त्यांनी वॉशिंग सेंटर, ईस्त्री काम, कुक्कुटपालन, गायपालन, अंतर्गत रस्ते आदी यशस्वी उपक्रम राबवले. त्यामुळे या कारागृहाचा उत्पादनात राज्यात दुसरा, तर पश्‍चिम महाराष्ट्रात पहिला क्रमांक आला होता. 

कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर भर देणार

श्री. गावडे म्हणाले, ‘‘सर्वात प्रथम कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर भर दिला जाईल. प्रशासनाची बाजू कशी मजबूत होईल, यासाठी प्रयत्न केला जाईल. बंदींच्या पुनर्वसनासाठी रोजगाराची आणखी पर्याय उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न राहील.’’

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dattatray Gavade New Kalamba Prison Superintendent