शासकीय रुग्णालयाच्या दारात मृतदेह राहतात पडून

वृत्तसंस्था
मंगळवार, 22 मे 2018

दुर्दैवाने मरण पावल्यानंतर संबंधितांच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाच्या दारी बारा-बारा तास वाट पहावी लागत आहे. मृत्यूनंतर होणारी ही वेदनादायी हेळसांड मृतांच्या नातेवाईकांची सत्वपरीक्षा घेत आहे. कर्जत तालुक्यातील जनता आपल्या वाट्याला आलेला हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून निमूटपणे सहन करीत आहे. ज्या कुटूंबियांवर हा दुर्दैवी प्रकार बेतला जात आहे ती मंडळी शासनाच्या अनास्थेविषयी संताप व्यक्त करण्यापलीकडे काहीही करू शकत नाहीत. 

राशीन - दुर्दैवाने मरण पावल्यानंतर संबंधितांच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयाच्या दारी बारा-बारा तास वाट पहावी लागत आहे. मृत्यूनंतर होणारी ही वेदनादायी हेळसांड मृतांच्या नातेवाईकांची सत्वपरीक्षा घेत आहे. कर्जत तालुक्यातील जनता आपल्या वाट्याला आलेला हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून निमूटपणे सहन करीत आहे. ज्या कुटूंबियांवर हा दुर्दैवी प्रकार बेतला जात आहे ती मंडळी शासनाच्या अनास्थेविषयी संताप व्यक्त करण्यापलीकडे काहीही करू शकत नाहीत. 

कर्जत तालुक्यातील राशीन, मिरजगाव, कुळधरण, बारडगाव सुद्रिक, चापडगाव या पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात व कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात एकही शवविच्छेदन कर्मचारी नसल्याने करमाळा (जि. सोलापूर) किंवा श्रीगोंदा येथून तेथील शवविच्छेदन कर्मचाऱ्यास बोलवावे लागते. तोपर्यंत मृतदेहासोबत नातेवाईकांना या शासकीय रुग्णालयांमध्ये नाईलाजाने बसावे लागत आहे. शिवाय या बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मृतांच्या नातेवाईकांना वेगळे पैसे मोजावे लागत आहेत. 

राशीन हे गाव नगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने या भागातील इतर ठिकाणचे मृतदेह येथे आणलेले असतात, तर भीमा नदीच्या पात्रात अनेक मृतदेह वाहून येतात. त्याचप्रमाणे तालुक्याच्या पुर्व भागातून जाणाऱ्या नगर-सोलापूर महामार्गावर सतत अपघात होऊन त्यात मरणारांची संख्याही मोठी आहे. याशिवाय आत्महत्या, सर्पदंश, पाण्यात बुडून, आगीत भाजून अकस्मात घटनांही सातत्याने घडतात. या सर्व प्रकारात मरणाऱ्यांचे शवविच्छेदन करावेच लागते. पोलिस केसमध्ये शवविच्छेदन हा महत्वाचा भाग असतानाही कर्जत तालुक्यात एकही शवविच्छेदन कर्मचारी नाही.

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन कर्मचारी नाही त्यामुळे रात्रभर मृतदेह घेऊन येथे बसावे लागत आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी लक्ष घालून कायमस्वरुपी कर्मचारी नेमुन लोकांची गैरसोय दूर करावी, असे मत भिमराव साळवे यांनी व्यक्त केले. तर, रिक्त झालेल्या पदावर नवीन कर्मचारी न घेतल्याने तालुक्यात अनेक वर्षांपासून एकही शवविच्छेदन कर्मचारी नाही. त्यामुळे बाहेरील तालुक्यातुन त्यांना विनंती करून बोलवावे लागते, असे वैद्यकिय अधिकारी डॉ. सुभाष शिंदे यांनी सांगितले. त्याचबरोबर, कर्मचाऱ्यांअभावी शवविच्छेदनास विलंब होऊन मृतदेहाची दुर्गंधी येऊन एकप्रकारे विटंबनाच होते. त्यामुळे येथे तातडीने शवविच्छेदन कर्मचारी नेमावेत अशी मागणी मनसे शहराध्यक्ष अशोक टाक यांनी केली आहे.

Web Title: dead bodies are pending at government hospital rashin