सांगलीतील मुक्त विद्यापीठात विद्यार्थिनीचा खून

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 डिसेंबर 2018

सांगली - येथील माधवनगर रस्त्यावरील शांतिनिकेतन लोक-विद्यापीठाच्या शाळेतील एका वर्गात वैशाली रामदास मुळीक (वय २१, रा. कसबे डिग्रज) या विवाहित विद्यार्थिनीचा ओढणीने गळा दाबून खून करण्यात आला. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

सांगली - येथील माधवनगर रस्त्यावरील शांतिनिकेतन लोक-विद्यापीठाच्या शाळेतील एका वर्गात वैशाली रामदास मुळीक (वय २१, रा. कसबे डिग्रज) या विवाहित विद्यार्थिनीचा ओढणीने गळा दाबून खून करण्यात आला. सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. खुनाचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून, मुक्त विद्यापीठातील एक प्राध्यापक यात संशयित असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. शांतिनिकेतनमध्ये ही घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

वैशाली मुळीक हिचे मल्लेवाडी (ता. मिरज) हे माहेर आहे. कसबे डिग्रजमधील रामदास मुळीक यांच्याशी तिचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. त्यांना दीड वर्षाचे मूलही आहे. शांतिनिकेतमधील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कला विभागाच्या दुसऱ्या वर्षात वैशाली शिकत होती. मुक्त विद्यापीठाचे वर्ग रविवारी असल्याने तिला पतीने 
सकाळी शांतिनिकेतमध्ये सोडले. त्यानंतर पती निघून गेले. साडेनऊच्या सुमारास शांतिनिकेतनमधील कन्या शाळेतील तिसऱ्या मजल्यावर वर्गात ती गेली होती. त्यावेळी तिच्यासोबत संशयित प्राध्यापक होता. दोघेही वर्गात गेल्याचे सीसीटीव्हीत दिसते.

दरम्यान, सव्वादहाच्या सुमारास शाळेचा शिपाई वर्ग उघडण्यासाठी आल्यानंतर वैशाली हिचा मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. माहिती मिळताच संजयनगर पोलिसांसह स्थानिक गुन्हे  अन्वेषणच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. अपर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, उपाधीक्षक अशोक वीरकर, निरीक्षक अनिल तनपुरे, सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. 

घटनास्थळी पोलिसांनी वैशालीची एक पर्स मिळाली आहे. त्यात तिचे पॅनकार्ड, फोटो यांसह मुक्त विद्यापीठाचा एक फॉर्म मिळाला. त्यानंतर नातेवाइकांना कळविण्यात आले. पती रामदासने घटनास्थळी आल्यानंतर आक्रोश केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजआधारे प्राध्यापकावर संशय आहे. रात्री उशिरापर्यंत त्याला ताब्यात घेण्यात आले नव्हते.

प्राध्यापक सीसीटीव्हीत कैद
घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सकाळी नऊच्या सुमारास वैशाली आणि फुल शर्ट घातलेला प्राध्यापक शांतिनिकेतन कन्या शाळेत आल्याचे दिसते. त्यानंतर सव्वादहा ते साडेदहाच्या दरम्यान तो शर्टच्या बाह्या मुडपून बाहेर जातानाही सीसीटीव्हीत दिसला. ती व्यक्ती तेथून निघून गेल्यानंतरच वैशालीचा खून झाल्याचे उघड झाले. त्यामुळे त्यानेच खून केला असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

Web Title: Dead body of student found in Sangli open University