आडी येथे विजेच्या धक्‍क्‍याने शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जुलै 2019

  • आडी (ता. निपाणी) येथील आडी - सौंदलगा मार्गाशेजारी शेतात विजेच्या धक्‍क्‍याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
  • मुरारी वासु बन्ने (वय 60, माळभाग. आडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव
  • घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलिस स्थानकात
  • वीजवाहिन्यांकडे दुर्लक्ष केल्याने हेस्कॉमबाबत संताप

निपाणी - आडी (ता. निपाणी) येथील आडी - सौंदलगा मार्गाशेजारी शेतात विजेच्या धक्‍क्‍याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. 15) सकाळी उघडकीस आली. मुरारी वासु बन्ने (वय 60, माळभाग. आडी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेची नोंद निपाणी ग्रामीण पोलिस स्थानकात झाली आहे. वीजवाहिन्यांकडे दुर्लक्ष केल्याने हेस्कॉमबाबत संताप व्यक्त होत आहे.

याबद्दल माहिती अशी, मुरारी बन्ने हे रविवारी (ता. 14) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास जनावरांना चारा आणण्यासाठी डोंगराच्या बाजूला असणाऱ्या शेतात गेले हाते. पण आजुरे यांच्या शेतात विद्युत वाहिनी तुटून पडल्याने तिचा त्यांना स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दिवसभर बन्ने घरी न परतल्याने घरच्यांनी शोधाशोध केली. पण त्यांचा शोध लागला नाही. आज सोमवारी (ता. 15) सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास बन्ने यांचा मृतहेद डोंगराकडील उसाच्या शेतात आढळून आला. विज वाहिनीचा धक्का बसल्याने ते जागीच ठार झाल्याचे आढळून आले.

घटनास्थळी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. निपाणी ग्रामीण पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. बन्ने यांच्या मागे दोन मुलगे, सूना, नातवंडे असा परिवार आहे. मेंढी पालनाचा त्यांचा व्यवसाय होता.

हेस्कॉमचे वाहिन्यांकडे दुर्लक्ष 

आडी परिसरात शेतवाडीत विविध ठिकाणी विद्युत वाहिन्या लोंबकळत आहेत. उन्ह, वाऱ्याने कित्येक ठिकाणी वाहिन्या धोकादायक स्थितीत आहेत. याबद्दल शेतकरी, नागरिकांनी हेस्कॉमकडे तक्रारी केल्या आहेत. पण दुरुस्तीकडे हेस्कॉमचे दुर्लक्ष आहे. हेस्कॉमच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचा बळी जात असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.   
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of Farmer due to Electric shock