डेंगीसदृश्‍य आजाराने सोलापुरात शालेय विद्यार्थिनींचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

- शहरात डेंगीचा प्रादुर्भाव वाढला

 - प्रशासनाचे दुर्लक्ष 

- 200 संशयित रुग्ण आढळले

सोलापूर ः डेंगीसदृश्‍य आजाराने केतकी रमेश उडाणशिव (वय-14) या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा आज सोमवारी सकाळी मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांत 
शहरात डेंगीचा प्रादुर्भाव वाढला असतानाही महापालिका प्रशासनाकडून अपेक्षित उपाय योजना केल्या जात नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. 

केतकीला काल (रविवारी) रात्री ताप आला व ती बेशुद्ध पडली. तिच्या पालकांनी तिला अश्‍विनी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतानाच 
आज सकाळी तिची मृत्यू झाला. या प्रकरास महापालिका आरोग्य विभाग जबाबदार असल्याचा आरोप नगरसेविका फिरदोस पटेल यांनी केला.
 त्या म्हणाल्या,""प्रभागामध्ये डेंगीसदृश्‍य रुग्णांची संख्या वाढल्याने औषध फवारणी व धुरावणी करावी अशी मागणी वारंवार केली. मात्र त्याची दखल घेण्यात आली नाही. 
त्यामुळे आम्ही स्वखर्चातून प्रभागातील नागरिकांना ओडोमास वनस्पतीची रोपे आणि डासप्रतिबंधक औषधांचे वाटप केले. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच आज एका विद्यार्थिनीला जीवाला मुकावे लागले.'' 

दरम्यान, केतकीचा मृत्यू डेंगीसदृश्‍य आजाराने झाल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आल्याचे रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजेंद्र घुली यांनी सांगितले. 
तिच्या रक्ताचे नमुने एनआयव्हीला पाठविण्यात येणार असून, त्यानंतर मृत्यू नेमका कशाने झाला हे स्पष्ट होणार आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, 
या घटनेस महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा ठपका ठेवत तिचा मृतदेह न उचलण्याची भूमिका तिच्या कुटुंबिय आणि नागरीकांनी घेतली. 
मात्र चर्चेनंतर केतकीचा मृतदेह घरी नेण्यात आला. 

शहरात 200 संशयित रुग्ण 
सोलापूर शहरात गेल्या दोन महिन्यांत डेंगीसदृश्‍य आजाराचे सुमारे 200 रुग्ण आढळून आले.  त्यापैकी 62 जणांना डेंगीची लागण झाल्या अहवाल आहे. जानेवारीपासून आजपर्यंत 763 संशयित रुग्ण होते. त्यापैकी 110 जणांना डेंगीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पहिल्या टप्प्यात 48 आणि दुसऱ्या टप्प्यात 62 जणांचा अहवाल आला व त्यामध्ये डेंगीची लागण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. डेंगीसदृश्‍य आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने घरोघरी तपासणी केली जात आहे. ज्या ठिकाणी पाणी साठवून ठेवण्यात आले आहे, तेथील कंटेनर रिकामे केले जात आहे. गच्चीवरील पाण्याच्या टाक्‍या, फ्रिज आणि एसी व कुलरमधील साचलेले पाणी तीन दिवसानंतर बदलण्यास सांगण्यात आले आहे. अनेक घरांमध्ये लारव्हा आढळल्या, तर बांधकामे सुरु असलेल्या काही ठिकाणी ड्रममध्ये पाणी साठवून ठेवल्याचे आढळले. 

महाराष्ट्र 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: death of schoo student dengue