तेजोमयराजे खर्डेकर यांचा अपघाती की बुडून मृत्यू ?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

तेजोमयराजे यांनी रेडिओ व फायनान्स क्षेत्रात काम केले. सध्या ते शेती करत होते. त्यांच्या मागे आई, दोन भाऊ, पत्नी, मुले असा परिवार आहे.

कोल्हापूर - खर्डेकर जहागिरदार घराण्याचे वंशज श्रीमंत तेजोमयराजे शिवाजीराजे ऊर्फ शिबिराजे खर्डेकर-निंबाळकर (वय ३९) यांचा मृतदेह मुक्त सैनिक वसाहत येथील नाल्यात तरंगताना आढळून आला. अपघात की बुडून मृत्यू, याचा शाहूपुरी पोलिस शोध घेत आहेत. याबाबतची नोंद करण्याचे काम शाहूपुरी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होते. 

दरम्यान, तेजोमयराजे यांच्या मृत्यूची बातमी कळताच श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, महाराजकुमार मालोजीराजे व साताऱ्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी खर्डेकर कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती - मुक्त सैनिक वसाहत रिक्षा थांब्याला लागून वाहणारा नाला शिल्पसागर अपार्टमेंट रस्त्यावरून पुढे जातो. या नाल्यात आज सकाळी तरुणाचा मृतदेह तरंगताना नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी अग्निशामक दलाच्या मदतीने त्या तरुणाला बाहेर काढले. हेडकॉन्स्टेबल बजरंग हेब्बाळकर यांनी तरुणाला सीपीआरमध्ये दाखल केले; मात्र त्यांचा यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. दरम्यान, संबधित मृतदेह तेजोमयराजे खर्डेकर-निंबाळकर यांचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी याची माहिती त्यांच्या नातेवाइकांना दिली. त्यांनी सीपीआरमधील शवविच्छेदन विभागात गर्दी केली होती. त्यांचा मृत्यू अपघाती की बुडून झाला, याबाबत पोलिसांनी शोध सुरू केला आहे. 

खर्डेकर घराण्याचे वंशज...
भगवानराव ऊर्फ बाळासाहेब खर्डेकर बॅरिस्टर परीक्षा लंडनमध्ये उत्तीर्ण झाले. ते १९५२ ते १९५७ दरम्यान कोल्हापूर जिल्ह्याचे पहिले खासदार होते. त्यांच्या नावे शिवाजी विद्यापीठात बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालय आहे. तेजोमयराजे हे खर्डेकर घराण्यातील वंशजांपैकी एक. शिवाजीराजे ऊर्फ शिबिराजे खर्डेकर यांना तेजोमयराजे, देवेंद्रराजे व प्रद्युम्नराजे ही तीन मुले. खर्डेकर घराण्याचा इतिहास शौर्यशाली आहे. या घराण्यातील हैबतराव यांनी खर्डा देशमुखीचा कारभार पाहत असताना १७९५ मध्ये हैदराबादच्या निजामाविरुद्ध खर्डा येथील रणसंग्रामात पराक्रमाची शर्थ केली. ही लढाई मराठा साम्राज्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली. हैबतराव यांच्यासह त्यांची नऊ मुले रणसंग्रामात धारातीर्थी पडली. त्यांचे दहावे पुत्र सुलतानराव यांना कोल्हापूर छत्रपती शिवाजी महाराज तिसरे यांनी कोल्हापूरला आणले. सुलतानरावांचे पुत्र हणमंतराव यांना जहागिरदार व सरलष्कर पदवीने सन्मानित करण्यात आले. बाबाराजे निंबाळकर-खर्डेकर सरलष्कर बहाद्दर यांना यशवंतराव ऊर्फ दादाराजे (सध्या सरलष्कर बहाद्दर), राजसिंहराजे ऊर्फ बंटीराजे व शिवाजीराजे ऊर्फ शिबिराजे ही मुले. जुना राजवाडा परिसरातील सरलष्कर बहाद्दरांचा अलिशान वाडा होता. त्या जागेवर सरलष्कर भवनची इमारत बांधण्यात आली आहे. हे घराणे १९३७-३८ ला सर्किट हाऊससमोरील जागेत स्थलांतरीत झाले. ध्वज, सूर्य, चंद्र, दोन तोफा, दोन तलवारी, जय भवानी असे या घराण्याच्या राजचिन्हाचे स्वरूप आहे. दानोळीतील सीमोल्लंघन व मोहरमचा मान खर्डेकर घराण्याकडे आहे. 

तेजोमयराजे यांनी रेडिओ व फायनान्स क्षेत्रात काम केले. सध्या ते शेती करत होते. त्यांच्या मागे आई, दोन भाऊ, पत्नी, मुले असा परिवार आहे. तोरस्कर चौक परिसरातील पेरूची बाग येथे उद्या (ता. २३) सकाळी दहा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of Tejomayraje Kardekar Nimbalkar