डिसेंबर ठरणार आध्यात्मिक अनुभूतीचा...!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

दत्त जयंती सप्ताह - सौंदत्तीला आज सुटणार गाड्या, त्यानंतर वेध अक्कलकोट वारीचे

दत्त जयंती सप्ताह - सौंदत्तीला आज सुटणार गाड्या, त्यानंतर वेध अक्कलकोट वारीचे
कोल्हापूर - खंडोबा चंपाषष्ठीनंतर आता सर्वत्र दत्त जयंतीच्या सप्ताहांना प्रारंभ झाला असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांत कोल्हापूरकर रमले आहेत. उद्या (ता. ९) ‘उदं गं आई उदं’ च्या गजरात सौंदत्तीसाठी वाहने रवाना होणार आहेत. दीडशेहून अधिक एसटी बसेस आणि तितक्‍याच खासगी वाहनांनी भाविक रवाना होणार आहेत. सोमवारी (ता. १२) अडीच लाखांहून अधिक कोल्हापूरकरांच्या उपस्थितीत सौंदत्तीवर यात्रा भरणार आहे. दरम्यान, त्यानंतर लगेचच अक्कलकोट वारीचे वेध लागणार असून त्याचे नियोजन आता सुरू झाले आहे. एकूणच सौंदत्ती आणि अक्कलकोट वारीच्या निमित्ताने देशभरातील विविध ठिकाणी धार्मिक पर्यटनावर भर दिला जाणार आहे.  

पूर्वांपार परंपरा असलेल्या सौंदत्ती यात्रेच्या निमित्ताने गेल्या काही वर्षांत देशभरातील विविध पर्यटनस्थळांना भेट देण्याची संकल्पना पुढे आली आणि ती यशस्वीही ठरली. वर्षभर हाडाची काडं करून राबणाऱ्या सामान्य कुटुंबातील लोकांना माफक शुल्कात देशभरातील धार्मिक व विविध पर्यटनस्थळांना वर्षातून किमान एकदा तरी भेट देता यावी, या उद्देशाने या सहलींचे आयोजन होते. यंदाही सौंदत्तीसह मंगसुळी, विजापूर, अलमट्टी, बदामी, कुडलसंगम, उडुपी, मंत्रालय, श्रवणबेळगोळ, धर्मस्थळ, मुरडेश्‍वर, पंढरपूर, अक्कलकोट, हैदराबाद फिल्म सिटी, दक्षिण भारत अशा विविध ठिकाणी सहली होणार आहेत.

गेल्या दोन दशकांपासूनची अक्कलकोट वारीची परंपरा यंदाही जपली जाणार आहे. अर्थात, नववर्षाचे संकल्प करताना व्यसनमुक्तीची शपथ घेतली जाणार आहे आणि आध्यात्मिक आनंदासह देशभरातील तीर्थक्षेत्रे व पर्यटनस्थळांना भेट दिली जाणार आहे. यंदाही गंगावेस, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, संभाजीनगर-मगरमठी, विक्रमनगरातील स्वामी समर्थ भक्त ३१ डिसेंबरच्या रात्री अक्कलकोट येथे भजनात तल्लीन होणार आहेत.

आध्यात्मिक आनंदात सरत्या वर्षाला निरोप देत एक जानेवारीला उगवतीच्या सूर्याच्या साक्षीने व्यसनमुक्तीची शपथही घेतली जाणार आहे. गेली दोन दशकं स्वामी समर्थ भक्तांनी ही परंपरा जपली असून, यंदाही गंगावेस येथील स्वामी समर्थ भक्त अक्कलकोटसह विविध तीर्थक्षेत्रांना भेट देणार आहेत. यापूर्वी अक्कलकोट वारीत नृसिंहवाडी, पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, अंबेजोगाई, परळी वैजनाथ, शेगाव, वेरूळ, अजंठा, खुल्दाबाद, शिर्डी, शनिशिंगणापूर, वणी, त्र्यंबकेश्‍वर, नारायणपूर, प्रतिशिर्डी अशा बावीस ठिकाणी सात दिवसांच्या सहलींचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांना या वारीत सहभागी व्हायचे आहे त्यांनी स्वामी समर्थ ॲटो गॅरेज (शाहू उद्यानजवळ) येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाते डोंगरालाऽऽऽ
‘जाते डोंगराला-तय्यारी मी केली’ असं गुणगाण गात उद्या (ता. ९) भाविक मोठ्या संख्येने सौंदत्तीकडे रवाना होतील. सोमवारी (ता. १२) यात्रेचा मुख्य दिवस असून शनिवारी आणि सोमवारी सकाळीही अनेक वाहने रवाना होतील. त्यासाठी एसटी महामंडळाकडे दीडशेहून अधिक बसेसचे आरक्षण झाले आहे. त्याशिवाय खासगी वाहतूक एजन्सीकडील बहुतांश सर्व वाहनांचे यात्रेसाठी बुकिंग झाले आहे.

Web Title: December will be a spiritual realization ...!