११० एकर जमिन समाज कार्यासाठी देण्याचा निर्णय कौतुकास्पद : भैय्याजी जोशी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

paschim maharashtra

११० एकर जमिन समाज कार्यासाठी देण्याचा निर्णय कौतुकास्पद : भैय्याजी जोशी

sakal_logo
By
अविनाश काळे,

उमरगा : स्वतः हितापेक्षा दुसऱ्याच्या हितासाठी झटणारी व्यक्ती समाजाप्रती आदर्शवत असते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे हुतात्मा (कै.) श्रीनिवास मुगळीकर, (कै.) गोपाळकर मुगळीकर यांच्या परिवाराने समाज, राष्ट्र कार्यासाठी ११० एकर जमिन देण्याचा संकल्प आणि दातृत्व महान आहे. जमिन दान दिलेल्या ठिकाणी विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि शेती विषयक प्रयोग समाजातील सर्व घटकासाठी उपयुक्त होतील आणि ते सामाजिक परिवर्तनाचे केंद्र होईल, यात शंका नाही, असे मत राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी सरकार्यवाह तथा अखिल भारतीय कार्यकारणीचे सदस्य भैय्याजी जोशी (नागपूर) यांनी व्यक्त केले.

उमरगा तालुक्याच्या सिमेलगत असलेल्या कर्नाटकातील जाजनमुगळी (ता. बस्वकल्याण) गावात हुतात्मा श्रीनिवास मुगळीकर व हुतात्मा गोपाळराव मुगळीकर यांच्या स्मारकाचे अनावरण श्री.जोशी यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.  केंद्रीय ऊर्जा व रसायन मंत्री भगवंत खुबा, कर्नाटक राज्याचे पशुपालक मंत्री प्रभु चव्हाण, सक्षम संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराज, श्री. निराजीबुवा विश्वस्त निधी ट्रस्टचे अध्यक्ष मधुकरराव महाजन, मुरलीधरराव मुगळीकर, उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, औश्याचे आमदार अभिमन्यु पवार, बस्वकल्याणचे आमदार शरणू सलगर, मुगळीचे सरपंच धनराज जाधव आदी उपस्थित होते.

हेही वाचा: सलगर चहाचे उलगडले ‘अमृततुल्य’ रहस्य.

या वेळी केंद्रिय मंत्री श्री. खुबा यांनी  देश, प्रांताच्या स्वांतत्र्यासाठी बलीदान दिलेल्या हुतात्मा मुगळीकर यांच्या प्रती सद्भावना व्यक्त करून ११० एकर जमिन समाज व राष्ट्र कार्यासाठी समर्पित करणाऱ्या मुगळीकर परिवाराच्या दातृत्वाचे कौतुक केले. ट्रस्टच्या माध्यमातुन साकारणाऱ्या प्रकल्पाला मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सक्षम संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदराज, पशुपालक मंत्री श्री. चव्हाण, निराजीबुवा विश्वस्त निधी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. महाजन यांचे यावेळी भाषण झाले. या वेळी मुरलीधरराव मुगळीकर यांनी प्रास्ताविकात बोलताना सांगितले की, वडिल हुतात्मा श्रीनिवास मुगळीकर बंधू गोपाळराव मुगळीकर यांनी १५ ऑगस्ट १९४७ ला उमरगा येथे चौकात तर बंधू गोपाळराव मुगळीकर यांनी मुगळी येथे तिरंगा ध्वज फडकावला, त्यांना रझाकारांनी कट करून ठार मारले. देशाभिमान जागविण्याचा त्यांचा निश्यय मूगळीकर परिवाराने केला आहे.

हेही वाचा: हिंगोली अर्बन परिवाराने दिला मदतीचा हात

त्रिकोळी (ता.उमरगा) येथे दिव्यांगाच्या स्वावलंबनासाठी काम करणाऱ्या सक्षम ट्रस्टला चौदा एकर जमिन दिली आहे. विविध उपक्रमासाठी जमिन दान देण्याचा निर्णय घेतला असुन जमिन लवकरच हंस्तातरित करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या वेळी भाजपाचे संताजी चालुक्य, कैलास शिंदे, रमेश माने, डॉ. मल्लीनाथ मलंग, अँड. राजेश्वरकर, एल. टी. मोरे, ट्रस्टचे विश्वस्त सुरजसिंह राजपुत, दिपक मुगळीकर, सतीश कोळगे, गिरीश हेब्बार, प्रशांत स्वामी, अभिषेक मुगळीकर, हणमंतराव पाटील, वैभव पाटील, आकाश मुगळीकर, संजय पटवारी यांच्यासह लातूर, उस्मानाबाद व बिदर, कलबुर्गी जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. अंजली देशमुख यांनी सूत्रसंचलन केले तर आशुतोष मुगळीकर यांनी आभार मानले. राघवेंद्र मुगळीकर, शीला धानोरकर, हरिपंतराव मुगळीकर, कुसूम पांडव, सिंधू माड्याळकर, अविनाश मुगळीकर, मालती देशमुख, विमलबाई कुलकर्णी, इंदुमती खरोसेकर आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेतला.

सर्वांची भाषणे मराठी भाषेत !

उमरगा तालुक्याच्या सिमेलगत असलेल्या जाजनमुगळीत मराठी भाषिक बहुतांश आहेत, मंत्री भगवंत खुबा, प्रभु चव्हाण यांनी मराठी भाषेत भाषणे केली, भैय्याजी जोशी यांनीही मराठी भाषेत मार्गदर्शन केले.

loading image
go to top