कचऱ्याने फुलवला जीवनात सुगंध

कचऱ्याने फुलवला जीवनात सुगंध

कोल्हापूर - खंडेनवमीमुळे गुरुवारी विविध वाहने झेंडूच्या माळांनी सजली होती. रुक्‍मिणीनगर, प्रज्ञापुरी परिसरातही अशीच सजलेली एक घंटागाडी फिरत होती. रंगीत फुगे, ऊस, लव्हाळा, झेंडूच्या फुलाच्या माळांमुळे गाडी वेगळी दिसत होती. हॉर्न नव्हता; पण टणऽ टणऽऽ टणऽऽ अशी एका लयीत घंटा वाजवत ही गाडी प्रत्येकाच्या दारात उभी राहत होती. कारण ही गाडी चक्क कचरा घंटागाडी होती. महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी ही गाडी म्हणजेच कुटुंबाचा आधार या भावनेने सजवली होती.

जनार्दन बापू कांबळे असे या आगळ्यावेगळ्या जाणिवेने काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव. प्रत्येकाच्या दारात जाऊन ओला-सुका कचरा गोळा करायचा. कचऱ्यात जर शिळे अन्न असेल, तर ते वेगळे घेऊ लागले आणि समोर भटके जनावर दिसले, की त्याला ते खाऊ घालू लागले.

घंटागाडी म्हणजे घाणीने भरलेली, चाकांना तेलपाणी नसलेली किंवा या सायकलवर कोणालाही बसता येणार नाही अशी दुरवस्था असलेली गाडी; पण जनार्दन कांबळे यांनी आपली घंटागाडी तेलपाणी, रंगरंगोटीसह व्यवस्थित ठेवली. खंडेनवमीला इतर लोक आपापली वाहने फुलांच्या माळा, लव्हाळ्यांनी सजवत असल्याचे ते पाहत होते. त्यांनी यावर्षी आपली गाडी खंडेनवमीचे औचित्य साधून सजवली आणि प्रत्येकाच्या दारातला कचरा उचलायचा, घंटा वाजवून आपण आलोय याची सूचना देण्याचा पायंडा पाडला. जनार्दनमामांच्या या गाडीचे छायाचित्र मोबाईलवर क्‍लिक करून रहिवाशांनीही (प्रभाग १८) आनंद व्यक्त केला.

घंटागाडी आली, की काही लोक नाक मुरडतात; पण माझी घंटागाडी कचऱ्याने भरलेली असली तरीही स्वच्छ असते. कचऱ्याचा वास लोकांना जाऊ नये किंवा कचरा लोकांच्या नजरेस पडू नये, म्हणून मी तो झाकतो. खंडेनवमीला ही गाडी सजवली; कारण ती माझी पोटाचा आधार आहे. तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला दसऱ्यासारखा आणखी चांगला मुहूर्त कुठला? 
- जनार्दन बापू कांबळे, 

कचरा घंटागाडी चालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com