बापूंना बढती, बाबा गैरहजर!

प्रवीण जाधव
शुक्रवार, 26 जुलै 2019

सातारा विधानसभा मतदारसंघाच्यादृष्टीने आज दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. दीपक पवारांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला, तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखतीला दांडी मारली. त्यामुळे या मतदारसंघाच्या राजकीय गर्भात काय अंकुरणार, असा प्रश्‍न निर्माण होतो आहे.

सातारा - सातारा विधानसभा मतदारसंघाच्यादृष्टीने आज दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. दीपक पवारांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला, तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखतीला दांडी मारली. त्यामुळे या मतदारसंघाच्या राजकीय गर्भात काय अंकुरणार, असा प्रश्‍न निर्माण होतो आहे.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला कोणत्याही परिस्थितीत खिंडार पाडण्याचा चंग भारतीय जनता पक्षाच्या धुरिणांनी बांधला आहे. त्यादृष्टीने गेल्या साडेचार वर्षांपासून त्यांची बांधणी सुरू आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विविध दौऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याचे काम केले. त्याचबरोबर काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये असलेल्या दिग्गजांनाही गळाला लावण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहेत. त्याच प्रयत्नांचे एक यश म्हणजे किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांचा भाजप प्रवेश. लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांना पक्षात घेण्यासाठीही भाजपने ‘फिल्डिंग’ लावली होती; परंतु उदयनराजेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली नाही.

लोकसभा निवडणुकीदरम्यान जिल्ह्यामध्ये दोन दुखऱ्या नसा भाजपच्या समोर आल्या. एक म्हणजे माणचे आमदार जयकुमार गोरे व उदयनराजे-शिवेंद्रसिंहराजे यांच्यामधील दुरावा. हे दोघेही लोकसभा निवडणुकीत आम्हालाच मदत करतील, असा दावा भाजपच्या उमेदवारांकडून केला जात होता. त्यातील जयकुमार गोरे यांनी तर, उघडपणेच प्रचार केला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही विद्यमान आमदार भाजपकडे जातील, अशा चर्चा सुरू झाल्या. दोघांकडूनही या गोष्टी नाकारल्या गेल्या; परंतु राजकारणात कधीही काही घडू शकते. आज अचानक समोर आलेल्या घटनांमुळे या तर्कवितर्कांना पुन्हा सुरवात झाली आहे.
भाजपचे सातारा मतदारसंघातील मागील निवडणुकीचे उमेदवार दीपक पवार यांना भाजपने पश्‍चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे अध्यक्षपद देत राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला. मागील निवडणुकीमध्ये दीपक पवार यांनी चांगली लढत दिली होती. शिवसेना व भाजप स्वतंत्र लढले नसते, तर कदाचित निकाल काठावर आला असता, अशी परिस्थिती होती. त्यानंतर गेली साडेचार वर्षे त्यांनी सातत्यपूर्णपणे मतदारसंघातील संपर्क वाढवत नेला. विविध विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी गावोगावी भाजपचे चांगले ‘नेवटर्क’ तयार केले. त्यामुळेच मतदारसंघातील दोन्ही तालुक्‍यांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायती व नगरपालिका निवडणुकीत यापूर्वी कुठेच नसलेल्या भाजपला चांगले यश मिळाले. लोकसभा निवडणुकीमध्येही जावळी तालुक्‍यात शिवसेनेच्या उमेदवाराला मताधिक्‍य मिळवून देण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या या कामाची दखल घेत भाजपच्या धुरिणांनी त्यांना राज्यमंत्री दर्जाचे बक्षीस दिले. लढण्यासाठी पदाधिकाऱ्यांची ताकद व मनोबल वाढविण्याचाच हा एक भाग आहे. त्यामुळे या मतदारसंघातील जनतेचा उमेदवारावर विश्‍वासनिर्माण होण्यास मदत होते. आगामी निवडणुकीसाठी पक्षाने दीपक पवार यांची बाजू भक्कम केली, असेच या निर्णयावरून सरळपणे म्हणता येऊ शकते. या सकारात्मक गोष्टी असल्या, तरी दुसरीकडे राष्ट्रवादीच्या गोटातही अनपेक्षित घटना घडली.

माजी मुख्यमंत्री अजित पवार हे विधानसभा इच्छुकांच्या स्वत: मुलाखती घेत असताना विद्यमान आमदार शिवेंद्रसिंहराजे तिकडे गेले नाहीत. त्यामुळे ते भाजपच्या गळाला लागले तर नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. दीपक पवारांची बढती आणि शिवेंद्रसिंहराजे यांची दांडी याची सांगड घालून अंदाज बांधले जात आहेत.

दीपक पवार यांना त्यांच्या कष्टामुळेच पद मिळाले आहे; परंतु राजकीय धुरिणांना त्यामागे भाजपचा काही कावा आहे का? असाही संशय येतोय. पवारांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा आणि शिवेंद्रसिंहराजेंना उमेदवारी असे गणित तर मांडले जाणार नाही ना, असे आखाडे बांधले जात आहेत.

राज्यमंत्रिपदाचा दर्जा हा पवारांची मनधरणी करण्यासाठी उपयोगीही पडेल आणि प्रसंगी शिवेंद्रसिंहराजेंचा नकार आल्यास त्यांच्या विरोधात लढण्यासाठी ताकद देणाराही ठरेल, या दोन्ही हेतूने भाजपने ही खेळी खेळल्याचा संशय व्यक्त होत आहे. दीपक पवार मात्र, निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे नेमके काय होणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepak Pawar State Minister Shivendrasinhraje Bhosale Politics