काळवीट, रानडुकरांची संख्या वाढली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मे 2019

वन्य प्राण्यांची गणना (कंसात मागील वर्षीची संख्या)
काळवीट - ३१३ (१९६), लांडगा - ७ (११), ससा - ४४ (४०), खोकड - १५ (२७), मुंगूस - २ (४), रानडुक्कर - १९५ (१६८), माळढोक - १ (१), रानमांजर ः २ (६), मोर - ९१ (३६), सायाळ - ४ (२), घोरपड - ६ (११)

सोलापूर - नान्नज येथील माळढोक पक्षी अभयारण्याच्या वतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त सात गावांमधील पाणवठ्याच्या ठिकाणी वन्य प्राण्यांची गणना करण्यात आली. २४ तास केलेल्या या गणनेमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा काळवीट व रानडुकरांची संख्या वाढल्याचे दिसून आले. या गणनेमध्ये एकही माळढोक पक्षी दिसला नाही. ११ मे रोजी माळढोकची मादी आढळून आली होती. 

शनिवारी (ता. १८) दुपारी १२ ते रविवारी (ता. १९) दुपारी १२ या वेळेत ही गणना करण्यात आली. कारंबा, मार्डी, अकोलेकाटी, नान्नज, गंगेवाडी, पिंपळा, धोत्री-कासेगाव, वडाळा या गावांमध्ये ही गणना करण्यात आली. लांडगा, खोकड, मुंगूस, रानडुक्कर, ससा, रानमांजर, सायाळ, माळढोक, कोल्हा, घोरपड, मोर, वानर, काळवीट या प्राण्यांची गणना करण्यात आली. माळढोक पक्षी अभयारण्य नान्नज चे वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणराव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही गणना झाली. या गणनेमध्ये वनपाल जी. वाय. कुलकर्णी, एस. एस. बडे, बी. डी. ठेंगील, जी. एन. विभूते, एस. जी. जवळगी, ए. ए. फरतडे, वनमजूर बी. बी. मस्के, एस. ए. साठे, सुधीर गवळी, सी. व्ही. व्हनमोरे यांनी सहभाग घेतला. त्याचबरोबर काही पक्षिप्रेमीही या गणनेत सहभागी झाले होते. 

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा लांडग्यांची संख्या कमी झाली आहे. कारण, त्यांचा कळप फुटून स्थलांतर झाले असावे, असा निष्कर्ष या गणनेतून काढण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deer Wild Pig Increase