suryawanshi
suryawanshi

पराभूत धीरज सूर्यवंशींनी केले विजयी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचे अभिनंदन ! 

सांगली ः राजकारण हे निवडणुकीच्या आखाड्यापुरते असले पाहिजे आणि एकदा का निकाल लागला की विकासाच्या गोष्टींवर बोलले पाहिजे, असे कुणी कितीही म्हटले तरी असा प्रसंग फार कमीच येतो. तो आज सांगलीच्या आखाड्यात मात्र पहायला मिळाला. सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या महापौर पदासाठी आज आखाडा झाला आणि त्यात पराभूत उमेदवार, भाजपचे धीरज सूर्यवंशी यांनी विजयी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचे जाहीर अभिनंदन केले. त्याची पोस्ट फेसबूकच्या माध्यमातून झळकली आणि धीरज यांनी राजकारणात दाखवलेल्या मोठेपणाचे कौतुकही झाले. 


सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत सत्ता भाजपची. सरळ मताधिक्‍य. महापौर भाजपचाच होणार, असे आकडे. पण, राजकारणात कधीच दोन अधिक दोन चार नसते... इथे तसेच झाले. आयारामांची फौज असलेल्या भाजपमध्ये फूट पडली. भाजपचे सात नगरसेवक फुटले. पैका पाच जणांनी सरळ उलटे मतदान केले आणि दोन नगरसेवक गैरहजर राहिले. त्यामुळे भाजपकडून महापौर पदाची निवडणूक लढवणाऱ्या धीरज सूर्यवंशी यांनी पराभवाचे तोंड पहावे लागले. धीरज सूर्यवंशी हे पैलवान आहेत. खाड्यातील डावपेच, जय-पराजय पचवायची त्यांची क्षमता आहे. ते तरुण आहे, आक्रमक तरी संयमित आहेत. त्यामुळे या पराभवानंतर त्यांनी विजयी उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांचे अभिनंदन करणारे पोस्टर जाहीरपणे फेसबूकवर अपलोड केले. त्याची शहरात चर्चा सुरु झाली. 


दरम्यान, दिग्विजय सूर्यवंशी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. त्यांना 39 मते मिळाली तर धीरज यांना 36 मते मिळाली. कॉंग्रेस-राष्ट्रवादीने एकी दाखवली आणि भाजपमध्ये उभी फूट पडली. त्यामुळे येथे अडीच वर्षानंतर सत्तापालट करण्यात आघाडीला यश मिळाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी "करेक्‍ट कार्यक्रम' करत मात दिली. या लढाईत कॉंग्रेसचे नेते, राज्यमंत्री विश्‍वजीत कदम, कॉंग्रेस नेत्या जयश्री पाटील, युवा नेते विशाल पाटील यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची एकजूट दाखवण्यात महत्वाची भूमिका बजावली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com