अय्‍याशी पत्‍नीच ठरली सायलेंट किलर

Crime
Crime

कर्‍हाड (जि. सातारा ) : मोकळ्या ओसाड पण झाडाझुडपांच्या जाळीत मृतदेह पडल्याची घटना सुमारे दीड वर्षापूर्वी उघडकीस आली. ओगलेवाडी ते टेंभूकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या फाट्यानजीकची ती घटना. मृतदेह पडल्याच्या वार्तेने पोलिस दल त्वरित घटनास्थळी पोचले. घटनास्थळावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह तेथे पोलिसांना आढळला. त्याचा गळा चिरून खून केला होता. मोकळ्या रानात जिथे कोणी फिरकणारही नाही, अशा ठिकाणी नेवून संबंधित व्यक्तीला ठार करण्यात आले होते. मृत झालेली व्यक्ती कोण, ती येथे कशी आली, त्याचा खून कोणी केला, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधायची होती.

आव्हानात्मक बनलेल्या खुनाचा छडा खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी अवघ्या आठ दिवसांत लावला. यातील संशयित पोलिसात हजर झाला. त्यानंतरही त्यातील चौघे बेपत्ताच होते. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांना तपासाची शिकस्त करावी लागली. त्यासाठी बार्शीला दोन दिवसांचा मुक्काम अन्‌ संशयिताला पकडण्यासाठी वेशांतरासारख्या गोष्टीचा आधार घ्यावा लागला. या प्रकरणातील संशयित पोलिसात हजर झाल्यामुळे प्रियकराव्दारे पतीचा खून करणाऱ्या "सायलेंट किलर' पत्नीचा मात्र पर्दाफाश झाला होता.

अनैतिक संबंधात बाधा ठरणाऱ्या पतीचा पत्नीनेच सुपारी देवून खून केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. सारेच फरार असल्याने गुंतागुंतीचा बनलेल्या तपासात संशयिताने दिलेली माहिती, पोलिसांची खबर अशा सगळ्याच पातळ्यांवर चांगले काम झाल्याने याकडे उत्कृष्ट तपास म्हणून त्याकडे आजही पाहिले जाते. 

शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, फौजदार शिवराम खाडे, हवालदार सतीश जाधव, नितीन येळवे, प्रदीप कदम, जयसिंग राजगे, प्रमोद पवार यांनी त्या तपासात मोठा सिंहाचा वाटा उचलला होता. युवकाचा धारदार शस्त्राने गळा कापून खून झाला होता. किमान 24 तासांपूर्वी त्याचा खून करून मृतदेह ओगलेवाडी ते टेंभूकडे जाणाऱ्या रस्त्यालगत टाकला होता.

ओगलेवाडीहून टेंभूला जाणाऱ्या रस्त्यालगत स्टेशन फाट्यापासून जवळच्याच शेतात युवकाचा मृतदेह पडला होता. सुमारे तिशीतील युवकाचा धारदार शस्त्राने गळा कापून खून झाल्याचे पोलिस घटनास्थळी गेल्यानंतर स्पष्ट झाले. त्यात खून करून मृतदेह रस्त्यापासून शेतात टाकण्यात आलेला होता. तो झाडीत असल्याने सहज नजरेस पडत नव्हता. 

पोलिस घटनास्थळी पोचल्यानंतर रात्री बाराच्या सुमारास त्याची ओळख पटली. नाव स्पष्ट झाल्यामुळे तपासाची चक्रे गतीने फिरू लागली. त्याचा खून करून तो चाकू पुढच्या दिशेला भिरकावला होता. तोही पोलिसांनी जप्त केला होता. तत्कालीन पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे घटनास्थळी थांबून होते. पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळावरून मिळेल ती माहिती घेऊन तपासाची चक्रे फिरवली होती. घटनास्थळावर केलेल्या पंचनाम्यानुसार युवकाचा धारदार शस्त्राने गळा चिरून व पोटावरही वार केल्याचे पुढे आले होते. 

यावेळी पोलिसांनी घटनास्थळी शोधाशोध केली असता त्यांना चाकू व अन्य काही परिस्थितीजन्य पुरावे हाती लागले. मात्र, त्यांच्या पुढे आव्हान होते कारण शोधण्याचे. त्यातही पोलिसांनी विलंब लावला नाही. खून उघडकीस आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी खुनाचे कारण पुढे येवू लागले. 

संशयिताची ओळख पटल्यानंतर त्यांनी त्याची घराची माहिती घेतली. त्यावेळी पत्नी गायब होती. तिच्यासह तिचे तीन मित्रही बेपत्ता होते. पोलिसांचा त्यांच्यावर संशय बळावला होता. सारेजण खून झाल्यानंतर दोन दिवसांपासून फरार होते. त्यामुळे त्यांच्यावर शंका बळावली होती. काही परिस्थितीजन्य पुरावे पोलिसांच्या हाती लागले होते.

पोलिसांनी केलेल्या तपासात पत्नीशी त्याचा वाद होत होता, अशी माहिती पुढे आली. दारूचे व्यसन असलेला संशयित पत्नीलाही मारहाण करत होता. पत्नीचे अनैतिक संबंध होते. पत्नी जेथे राहत होती, तेथेही पोलिसांनी तपास केला. मात्र, काहीही माहिती हाती आली नाही. खुनाचा तपास करतानाच पोलिसांना आणखी एक महत्त्वाची माहिती हाती आली. त्यात पत्नीच्या घरी मोठा व्यवहार झाला होता. त्यातील मोठी रक्कम पत्नीला मिळाली होती. त्यावरूनही खुनाचा प्रकार झाला असावा, असा पोलिसांचा कयास होता. दोन दिवसांपासून त्याची पत्नी गायब होती. त्याशिवाय अन्य तिघेही गायब होते.

पत्नीच खून करवून घेणारी

पतीच्या खुनाच्या कटात पत्नीचाही सहभाग असावा, असा पोलिसांनी अंदाज बांधला. त्या दृष्टीने पोलिसांची तपासाची सूत्रे हलली. खुनानंतर चार दिवसांत बरीच माहिती पोलिसांच्या हाती आली. त्यात पत्नीच खून करवून घेणारी "सायलेंट किलर' निघाल्याची माहिती तपासात उघड होत होती. 

पोलिसांचे खबरे माहिती देत होते. त्याचवेळी या खुनातील एक संशयित पोलिसात आकस्मितपणे येऊन हजर झाला. खुनाच्या कटात तो प्रत्यक्षात सहभागी होता, असे त्याने पोलिसांना सांगितले होते. त्यामुळे पत्नीसह अन्य दोघांच्या शोधाची पोलिसांची मोहीम गतीत आली. पोलिसांच्या ताब्यातील संशयिताने पतीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची कबुली दिली होती.

त्याशिवाय खुनानंतर पत्नीसह तिघेजण एकत्रित पळून गेल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताने पुढील माहिती दिली. पत्नीसह तिघेजण बार्शी येथे आहेत, अशी माहिती संशयिताने दिली. 

ठरल्याप्रमाणे "प्लॅन' झाला

त्यानुसार पोलिस पथक बार्शीकडे रवाना झाले. बार्शीत दोन दिवसांचा ठिय्या मारल्यानंतर "सायलेंट किलर' पत्नीसह तिघेजण ताब्यात आले. पोलिसांनी मुख्य संशयित म्हणून पत्नीस अटक केली. त्यावेळी तिच्या प्रियकरासह त्याचे दोन मित्रही तिच्यासोबत होते. त्यापैकी एकाला खुनाची सुपारी दिली होती. खुनानंतर दोन लाख रुपये दिले जाणार होते. खून प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात पत्नीच "सायलेंट किलर' 
निघाली होती.

प्रियकराच्या मित्रांकडून पतीच्या खुनाचा काटा काढून ती नामानिराळी राहणार होती. मात्र, सारेच एकावेळी बेपत्ता झाल्यामुळे "सायलेंट किलर' पत्नी पोलिसांच्या जाळ्यात अडकली. पत्नीसोबत ठरल्याप्रमाणे "प्लॅन' झाला होता. पतीला ओगलेवाडी येथे नेण्यात आले. मात्र, घरातून बाहेर पडताना सारेच एकदम बाहेर पडले.

24 तासांनी घटना उघडकीस

तेच पोलिसांच्या तपासात महत्त्वाचे ठरल्याने ते सारेच अडकले. ते सारेच एकत्रित दारूही प्यायले. पतीला ओगलेवाडी येथे नेल्यानंतर रानात चौघेही बसले. तेथेच ठरल्याप्रमाणे पतीचा गळा चिरून खून झाला. कोणाच्या लक्षात येणार नाही, अशा स्थितीत मृतदेह टाकून चौघेही तेथून पळून गेले. खून झाल्यानंतर 24 तासांनी घटना उघडकीस आली. त्यामुळे 24 तासांत संशयित ठाणे, मुंबई पुन्हा कऱ्हाड व तेथून पंढरपूर, बार्शी भागात पळून गेले. 


संशयित पोलिसात हजर झाला अन्‌... 

ओगलेवाडीनजीकच्या आडरानात मृतदेह टाकला होता. खून झाल्याचे स्पष्ट होण्यापूर्वी 24 तास आधीच खून झाला होता. घटनास्थळावर चाकू सापडला होता. त्या प्रकरणात अन्य काही परिस्थितीजन्य पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. खुनात संशयित "सायलेंट किलर' पत्नीसह तीन मित्रांभोवती संशय होता. त्यासाठी तीन वेगवेगळी पथके तीन जिल्ह्यांत रवाना झाली होती.

मात्र, त्यांच्या हाती काहीच लागले नव्हते. खून प्रकरणातील एक संशयित पोलिसांकडे हजर झाल्यानंतर तपासाला गती आली. तो दुचाकी घेऊन पोलिस ठाण्यात हजर होण्यास येत असतानाच पोलिसांनी त्याला पकडले. त्याने खुनाची कबुली तर दिलीच त्याशिवाय खुनानंतर कोठे गेलो व पत्नीसह अन्य संशयित कोठे आहेत, याचीही माहिती पोलिसांना दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com