सावधान... डेंगी फैलावतोय!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

...अशी घ्या काळजी

  • आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळा
  • जादा काळ पाणीसाठा होऊ देऊ नका
  • घराजवळील डबकी बुजवावीत
  • आपला परिसर स्वच्छ ठेवा
  • शरीरावर पूर्ण कपडे वापरावेत
  • मच्छरदाणीचा वापर करावा
  • जुने टायर, भंगार साहित्य नष्ट करा
  • ताप आल्यास तत्काळ डॉक्‍टरांकडे जा

सातारा - घरात कोणी अनेकदा आजारी पडत असेल, त्याला अचानक ताप येत असेल, तर दुर्लक्ष करून नका... कारण, तो ‘डेंगी’ असू शकतो. जिल्ह्यातील आठ ठिकाणी डेंगीचा उद्रेक झाला असून, जानेवारीपासून २८५ रुग्ण डेंगीसदृश आढळून आले. त्यातील ६८ जणांना डेंगी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शिवाय, २५ जणांना हिवताप झाल्याचे आरोग्य विभागाच्या पाहणीत उघड झाले आहे.  

‘डेंगी’ हा संसर्गजन्य आजार असून, त्यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तसेच जिल्हा रुग्णालयामार्फत प्रयत्न सुरू आहेत. जुलै महिन्यात जादा पाऊस झाला, त्यामुळे डासांची उत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले. परिणामी, डासांची उत्पत्ती वेगाने झाली.

वातावरणातील बदल आणि डासांच्या उत्पत्तीमुळे विविध कीटकजन्य आजारांच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. जिल्ह्यातील जानेवारीपासून आजअखेरपर्यंत २८५ संशयित रुग्ण सापडले असून, त्यांच्या रक्‍ताचे नमुने घेऊन तपासले असता ६८ रुग्णांना डेंगी झाल्याचे आढळून आले. यामध्ये जून व जुलै महिन्यात ११९ डेंगीचे संशयित रुग्ण आढळून आले. त्यांच्या रक्‍ताचे नमुने तपासले असता ४२ जणांना डेंगी झाल्याचे समोर आले. 

आरोग्य विभागामार्फत डेंगीच्या साथी उद्‌भवू नयेत, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दैनंदिन पाणी साठवलेल्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. जेथे शक्‍यता असेल तेथे गप्पी मासे सोडण्यात येत आहेत. 

तुंबलेली गटारे वाहती करणे, रस्त्यातील खड्डे बुजविणे, डास जास्त असलेल्या ठिकाणी धुरळणी करणे आदी कामे ग्रामपंचायतींमार्फत केली जात आहेत. शिवाय, शाळा, ग्रामपंचायतींमध्ये सभा घेऊन त्याबाबत जनजागृती केली जात आहे. आरोग्य विभागामार्फत संशयित तसेच रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दिली. 

डेंगीची लक्षणे
  अचानक थंडी वाजून येऊन प्रखर ताप येणे
  डोके, हातापायात प्रचंड वेदना होणे 
  अशक्तपणा येणे, भूक न लागणे, मळमणे 
  कोणत्याच पदार्थाची चव न येणे
  गळा दुखणे, गळ्यात काटा टोचल्यासारखे वाटते 
  सर्वांगावर लाल सुरकुत्या पडून प्रचंड वेदना होणे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dengue Healthcare Sickness Alert