कऱ्हाडमध्ये 20 हजार घरांत डेंगीच्या अळ्या ; महापुरानंतर रुग्णांत वाढ

कऱ्हाडमध्ये 20 हजार घरांत डेंगीच्या अळ्या ; महापुरानंतर रुग्णांत वाढ

कऱ्हाड ः महापूर ओसरल्यानंतर शहरासह तालुक्‍यामध्ये डेंगीच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. जानेवारीपासून 455 डेंगीचे रुग्ण आढळून आले आहेत. आत्तापर्यंत त्यातील तीन रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. शहरातील विविध रुग्णालयांत सुमारे 104 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एका सर्व्हेत सुमारे 20 हजार घरांमध्ये डेंगीच्या डासांच्या अळ्या आढळून आल्या आहेत. 

कऱ्हाड पालिकेने स्वच्छतेत देशात पहिला क्रमांक पटकावला. मात्र, त्याच पालिकेच्या हद्दीतील जनता सध्या डेंगीसारख्या आजाराने त्रस्त आहे. स्वच्छ पाण्यावर होणाऱ्या डासांमुळे निर्माण होणाऱ्या डेंगीचे शहरात 104 रुग्ण आहेत. तालुक्‍याच्या हद्दीत त्यांची संख्या 261 आहे. अन्य जिल्ह्यातून येथे उपचाराला आलेल्या रुग्णांची संख्या 100 आहे. येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये डेंगीची चाचणी होते. तेथे 253 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. श्री हॉस्पिटलला 55, सह्याद्री हॉस्पिटलला 40, चैतन्य हॉस्पिटलला 30, रानडे हॉस्पिटलला 21, कऱ्हाड हॉस्पिटलला सात, साई हॉस्पिटलला पाच, सिद्धीविनायकला तीन, जाधव आणि ब्रह्मनाळकर हॉस्पिटलला प्रत्येक एक तर अन्य ठिकाणी चार रुग्ण उपचार घेत आहेत. जानेवारीपासून डेंगीचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, खऱ्या अर्थाने डेंगीच्या रुग्णांमध्ये जुलैमध्ये 160 तर ऑगस्टमध्ये 223 अशी सर्वाधिक वाढ झाली आहे. जूनमध्ये 25, मेमध्ये 15, एप्रिलमध्ये 12, मार्चमध्ये नऊ, फेब्रुवारीत दोन तर जानेवारीत तीन रुग्ण आढळले आहेत. आरोग्यविषयक शिक्षणाचा अभाव व स्वच्छता नसल्याने डेंगीचे रुग्ण वाढत आहेत, असे शासनाच्या पाहणीतील निष्कर्ष आहेत. येथील उपजिल्हा रुग्णालयाने शहरात दोन वेळा सर्व्हे केला. त्यातही त्याच त्रुटी जाणवल्या आहेत. उपजिल्हा रुग्णालयातर्फे शहरात सर्व्हे करण्यात आला. त्यात प्रत्येक घरातील भांडी तपासण्यात आली. त्यात सापडणाऱ्या अळ्यांचा सर्व्हे झाला. त्यांचे प्रमाण हे पाच टक्‍क्‍यांपेक्षा कमी असणे आवश्‍यक आहे. मात्र, शहरात त्यांचे प्रमाण दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे. शहरातील प्रत्येक घरातील अळीचे प्रमाण अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे. पाहणीनुसार सरासरी 20 हजार घरांमध्ये डेंगीच्या डासांच्या अळ्या आहेत. त्यामुळे लोकांनी आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्याची गरज आहे. त्याशिवाय उपजिल्हा रुग्णालयातर्फे "ऍक्‍टिव्ह सर्व्हे'ही करण्यात आला आहे. त्यातही धक्कादायक माहिती हाती आली असून, शहरातील सुमारे 25 घरांतील फ्रीजच डेंगीच्या डासांनी बाधित आहेत. त्यामुळे रोजचा सर्व्हे व 
त्यावरील उपाययोजनांचे काम हाती घेण्यात आले आहे. पालिकाही त्यांच्यासोबत कार्यरत आहे. 

स्वाइन फ्लूचे 28 रुग्ण 

डेंगीबरोबरच शहरात स्वाइन फ्लूचेही रुग्ण शासकीय सर्व्हेत आढळले आहेत. वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये 28 रुग्ण या आजाराने ग्रस्त असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यापूर्वीच त्या आजाराने तिघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मृत्यू झालेल्यांत एक जण दुशेरे येथील, तर अन्य दोघे सोलापूर जिल्ह्यातील आहेत. स्वाइन फ्लूबाबत मोठ्या प्रमाणात उपाययोजना सुरू आहेत. त्यामुळे महिनाभरात स्वाइन फ्लूचा नवीन रुग्ण आढळलेला नाही. 

...अशी घ्यावी काळजी 

* आठवड्यातून एक दिवस घरातील पाण्याचा साठा असलेली भांडी रिकामी करून ती घासून-पुसून ठेवावीत 
* घरातील पाणीसाठे झाकून ठेवावेत 
* परिसर स्वच्छ ठेवा, अडगळीतील साहित्य नष्ट करा 
* घराभोवती पाणी साचू देवू नका 
* खिडक्‍यांना जाळ्या बसवा 
* कोणताही ताप अंगावर काढू नका, त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या 
* ताप आल्यास ऍस्पिरीन किंवा ब्रुफेनसारखी औषधे घेऊ नका, ती धोकादायक ठरू शकतात. 

डेंगीची साथ ही "व्हायरल' आहे. तो आजार बरा होऊ शकतो. लोकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. आत्तापर्यंत 450 हून अधिक लोकांना डेंगीसदृश रोगाची लागण झाल्याची नोंद आमच्याकडे आहे. जुलैमध्ये 160 तर ऑगस्टमध्ये 223 रुग्ण आढळले आहेत. त्यातही शहरात 104 तर तालुक्‍याच्या विविध भागात 261 रुग्ण आहेत. त्यासाठीच्या लागणाऱ्या सर्व उपाययोजना आम्ही राबविल्या आहेत. स्वच्छता व आरोग्यविषयक शिक्षणाची जागरुकता लोकांमध्ये असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठीही आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत.
-डॉ. प्रकाश शिंदे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com