50 जणांवर हद्दपारीची कारवाई!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 50 जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे.

नगर : शहरातील कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 50 जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. येत्या महिन्याभरात त्यांच्यावर कारवाईची शक्‍यता आहे. 

नगर शहरामध्ये किरकोळ कारणावरून मारहाणीसारखे गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा प्रकारामधून केडगाव हत्याकांडासारख्या घटना घडल्या. त्यामुळे पोलिस दलाने त्यानंतरच्या काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये सजग पावले उचलली. हजारो जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली, तर शेकडो समाजकंटक व उपद्रवी लोकांना शहरातून तडीपार केले. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्या. 

दरम्यान, शहरातील शांतता कायमस्वरूपी टिकावी, यासाठी पोलिस रेकॉर्डवरील आणखी काही गुन्हेगार व समाजकंटकांना दोन वर्षांकरिता शहरातून हद्दपार करणार आहेत. पोलिस ठाण्यांकडून प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. मारहाणीसारखे सुमारे चार ते पाच गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांचा त्यात समावेश आहे. 

कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगार व उपद्रवी लोकांची जंत्री तयार केली आहे. प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये टोळी (सीआरपीसी 55) करून गुन्हा करणाऱ्याची टोळी फोडण्यासाठी हद्दपार करण्यात येते. पाच ते दहापेक्षा जास्त लोकांनी गुन्हा केल्यास त्यांना जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांतून हद्दपार करण्याचा प्रस्ताव (सीआरपीसी 56) दाखल करण्यात येतो. शिक्षा भागून आलेल्या एखाद्या व्यक्तीने पुन्हा गुन्हा केल्यास (सीआरपीसी 57) त्याच्यावरही हद्दपारीची कारवाई करण्यात येते. सीआरपीसी कायद्यान्वये पोलिसांकडून प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. येत्या महिनाभरात प्रस्तावावर कार्यवाहीची शक्‍यता आहे. 

अनेकांचे धाबे दणाणले 

भिंगार, बोल्हेगाव, नालेगाव, सिद्धार्थनगर, माळीवाडा, झेंडी गेट, मुकुंदनगर आदी परिसरात दादागिरी कमी करण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. त्यामुळे गुन्हेगारांसह राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

शांतता बिघडविणाऱ्यांची मोठी यादी 

शहरातील शांतता बिघडविणाऱ्यांची मोठी यादी पोलिस ठाण्यांकडे आहे. त्यातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींविरुद्ध हद्दपारीची कारवाई होण्याची शक्‍यता आहे. 

- संदीप मिटके, पोलिस उपअधीक्षक
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deportation action on 50 people!