इचलकरंजीत बनावट नोटांचा कारखाना उद्‌ध्वस्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

इचलकरंजी - निवडणुकीच्या काळातच इचलकरंजीत सुरू असणारा बनावट नोटा तयार करणारा कारखाना कोल्हापूर पोलिसांनी उद्‌ध्वस्त केला. यामागे मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्‍यता असून, टोळीतील चौघेजण हाती लागले असून, त्यांच्याकडून यंत्रसामग्रीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

इचलकरंजी - निवडणुकीच्या काळातच इचलकरंजीत सुरू असणारा बनावट नोटा तयार करणारा कारखाना कोल्हापूर पोलिसांनी उद्‌ध्वस्त केला. यामागे मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्‍यता असून, टोळीतील चौघेजण हाती लागले असून, त्यांच्याकडून यंत्रसामग्रीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या टोळीने बनावट नोटाही परिसरात मोठ्या प्रमाणावर खपविल्या असल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या चौकशीत पुढे येत असल्याचे समजते.

निवडणुकीच्या काळात पैसे आणि मद्याचा आमिषासाठी वापर केला जातो. त्याअनुषंगाने पोलिसांनी प्रत्येक बारीक गोष्टीवर लक्ष ठेवले आहे. इचलकरंजीतील दातार मळा परिसरात बनावट नोटांचा कारखाना असून, तेथून तयार होणाऱ्या नोटा बाजारात खपविण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागली. येथे काल दुपारी पोलिसांनी छापा टाकला. येथील चौघाजणांना त्यांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

संबंधित चौघा संशयितांकडून दातार मळा परिसरात एका ठिकाणी ते बनावट नोटा छापत होते, त्यांनी त्या नोटा अनेक व्यावसायिकांकडे खपविल्या असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यानुसार पोलिसांनी येथील यंत्रसामग्री ताब्यात घेतली असून, त्यांच्या हाती काही बनावट नोटाही लागल्या आहेत. त्याची शहानिशाही करण्याच्या कामाबरोबर संशयितांकडे पोलिसांची कसून चौकशी सुरू असल्याचे समजते.

ऐन निवडणुकीत बनावट नोटांचा कारखाना पोलिसांच्या हाती लागल्याची कुजबूज कालपासून परिसरात आहे; मात्र याबाबत स्थानिक पोलिस मात्र अनभिज्ञ असल्याबद्दल आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांची चौकशी सुरू असून, यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. याप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असल्याचे समजते. 

मतदारांना आमिषासाठी वापर?
निवडणुकीत मतदारांना आमिष दाखविण्यासाठी या नोटांचा वापर करण्याचा टोळीचा प्रयत्न होणार होता का? अशी शंका परिसरातील नागरिकांतून व्यक्त होत होती. त्याअनुषंगानेही पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे समजते.

पाचशेच्या नोटा
बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीने केवळ पाचशे रुपयांच्याच बनावट नोटा छापल्या होत्या. वेगवेगळ्या वस्तू खरेदीतून ही टोळी बनावट नोटा बाजारात आणण्याचा प्रयत्न करीत होती. परिसरातील एका टेलरकडेही त्यांनी पाचशेची नोट खपवली असल्याची चर्चा परिसरात सुरू होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Destruction of fake currency notes factory