नेतृत्‍वासाठी ठामपणा महत्त्वाचा !

नेतृत्‍वासाठी ठामपणा महत्त्वाचा !

सोलापूर - कोणतीही व्यक्ती परफेक्‍ट नसते. मात्र, प्रत्येकात कोणतेतरी एखादे कौशल्य असते, ते ओळखता आले पाहिजे. नेतृत्वासाठी नेत्यामध्ये ठामपणा आवश्‍यक असतो. ज्याच्यात ठामपणा नाही तो नेता होऊच शकत नाही. सोशल मीडियाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्याचा वापर जबाबदारीने करण्याची आवश्‍यकता आहे. तरुणांनी पोस्ट करताना समाजावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे, असे मत ‘यिन’तर्फे सुरू असलेल्या ‘समर यूथ समिट’मध्ये तज्ज्ञांनी व्यक्त केले.

यशस्वी होण्यासाठी घ्यावी लागते रिस्क - शरदकृष्ण ठाकरे
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर रिस्क घ्यावीच लागते. ही रिस्क घेण्याआधी पुढे काय होणार याचाही विचार करणे गरजेचे आहे, असे लक्ष्मी हायड्रोलिक्‍सचे व्यवस्थापकीय संचालक शरदकृष्ण ठाकरे यांनी सांगितले.

मेकॅनिकल इंजिनिअर झाल्यानंतर बजाज ॲटोत मला चांगली नोकरी होती. नोकरी करत असताना मनात उद्योजक होण्याचा विचार आला. १९७७ मध्ये नोकरीचा राजीनामा दिला आणि सोलापुरात येऊन व्यवसायाला सुरवात केली. आयुष्यात पुढे जाण्यासाठी निर्णय घ्यावाच लागतो. एखादा दुसरा निर्णय चुकूही शकतो, मात्र निर्णय घेणे हे प्रमुखाचे कामच आहे. या निर्णयातूनच तुम्ही पुढे जाता. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी आयटीक्षेत्राकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे फळ आज आपणास पाहण्यात येत आहे. आयटी क्षेत्रात आज भारताने नाव कमाविले आहे. असाच दूरदृष्टिकोन ठेवावा. आज आमची ६०० जणांची टीम तयार आहे. यात २५९ अभियंते आहेत.

रिसर्च आणि डेव्हलपमेंटकडे नेहमी लक्ष द्या
आपल्या कंपनीला आपले कुटुंब समजा
या कुटुंबाच्या प्रगतीसाठी चांगले  प्रयत्न करा

परिस्थितीला बनवा तुमची ताकद - जयसिंग चव्हाण
आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीचा अनेकजण बाऊ करतात. याच परिस्थितीला तुमची ताकद बनवा म्हणजे आयुष्यात तुम्ही यशस्वी व्हाल, असे रंजना ग्रुप ऑफ इंडस्‍ट्रिजचे जयसिंग चव्हाण यांनी सांगितले. ते झिरो टू मिलियन सक्‍सेसफुल बिझनेस या विषयावर बोलत होते.

खूप मोठ्या कष्टाने मी कंपनी उभी केली होती, त्या कंपनीला आग लागली. यात सर्वच जळून गेले. याचा मनावर परिणाम होऊ न देता, पुन्हा त्याच ताकदीने मी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. झाले ते विसरून नव्या जोमाने कामाला लागलो. आज एका चांगल्या स्थितीत कंपनीला पोचविले आहे. तसेच २६० रोजगार निर्माण केले आहेत. शारीरिक अपंगत्व हे अपंगत्व नसून मानसिक अपंगत्व हेच खरे अपंगत्व आहे. कोणतेही चांगले कार्य करण्याआधी आपण १० वेळा विचार करतो. पण ते पूर्ण करत नाही. असे करणे म्हणजे अपंगत्व आहे. माणसाने किड्या, मुंग्यासारखे राहायला नको. स्वतःच्या हिमतीने यश आपल्याकडे खेचले पाहिजे. रोजगार न करता रोजगार देण्याची भावना ठेवा. याच दृष्टिकोनातून मी दिव्यांगांना रोजगार देण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या त्यासाठी मुलाखतीही घेत आहे.

तोंडात साखर, डोक्‍यावर बर्फ ठेवा
हिंमत करा. मनातील आळस झटका.
पुढे आपल्याला मोठे व्हायचे आहे हा विचार करा

सेल्फ मार्केटिंग आवश्‍यक - सुजय खांडगे 
सध्या समाजातील इतर नागरिकांतून आपण उठून दिसण्याकरता मार्केटिंग गरजेचे आहे. स्वतःचे मार्केटिंग करणे कधीही महत्त्वाचे असते. त्यासाठी सेलिंग स्किल वाढवून स्वतःमधील वेगळेपण जगाला दाखवून द्या, असे मत यशूज डिजिटल मार्केटिंगचे सीईओ सुजय खांडगे यांनी व्यक्त केले. ते ‘डिजिटल मार्केटिंग’ या विषयावर बोलत होते.

खांडगे म्हणाले, ‘‘डिजिटल मार्केटिंग करण्याची गरज प्रत्येकाला आहे. समाजात उठून दिसण्याकरता काहीतरी कौशल्य लागते. हे कौशल्य नागरिकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवण्याला मार्केटिंग असे म्हणतात. सोशल मीडियाशिवाय जगण्याची कल्पना आपण कोणी करू शकत नाही. भविष्यात तुम्ही जॉबसाठी एखाद्या ठिकाणी गेलात तर तेथील एचआर मॅनेजर तुमचे सोशल प्रोफाइल तपासून पाहू शकतात. सोशल मीडिया केवळ फेसबुक, व्हॉट्‌सअपपुरते मर्यादित नाही. यूट्यूब, ट्‌वीटर इन्स्टाग्राम व लिंक्‍डइन यांसारख्या मीडियाचा वापर सर्वांनी योग्य पद्धतीने करावा. आपली एक कमेंट ही समाजाला हादरवून टाकू शकते.’’

सोशल मीडियाशिवाय दैनंदिन जीवन शक्‍य नाही
स्वतःचे मार्केटिंग केल्यास यश नक्की मिळते
तुमच्यातील वेगळेपण जगाला दाखवून द्या

परस्परांचा आदर महत्त्वाचा - डॉ. राम गुडगिला
प्रत्येक माणसात ठामपणा, नरमाई व आक्रमकता असते. मात्र, समाजाचे नेतृत्व करण्यासाठी ठामपणा असणे आवश्‍यक असते, असे मत पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन एक्‍स्पर्ट डॉ. राम गुडगिला यांनी व्यक्त केले. ते टीम बिल्डिंग या विषयावर बोलत होते.
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. समूहात काम करताना परस्परांचा आदर करून सर्वांनी मिळून काम केल्यास यश नक्कीच मिळते. आपले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सर्वांच्या संमतीने सर्व निर्णय घ्यावेत. कोणीही परिपूर्ण नसतो, त्यामुळे प्रत्येकातील चांगल्या कौशल्याचे निरीक्षण करून योग्य ते काम त्यांना द्यावे, कोणत्याही संघटनेत एकच नेतृत्व असू शकते. अनेक नेते झाल्यास ते सर्वांच्या अडचणीचे ठरते. आपल्या क्षमता, कमजोरी माहीत असणे आवश्‍यक असते. आपल्यासमोरील धोक्यांची आपल्याला कल्पना असावी, तसेच मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करावा, असे डॉ. गुडगिला म्हणाले. 

ठाम भूमिका घेऊन तटस्थ निर्णय घ्यावेत. 
समूहात कोणालाही कमी लेखू नये.
लेखी संपर्क व नोंदी ठेवून काम केल्यास छाप पडते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com