कमळ फुलवण्यासाठी जोरदार मशागत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 मे 2017

कोल्हापूर - पंधरा-वीस वर्षांपूर्वी शहराच्या एका चिंचोळ्या गल्लीपुरता मर्यादित असलेल्या भारतीय जनता पक्षाचा विस्तार आता ग्रामीण भागापर्यंत पोचला आहे. पक्षाच्या विस्ताराला बळ देण्यासाठी उद्या (ता. २९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गारगोटी (ता. भुदरगड) येथे येत आहेत. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच गारगोटीत येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. 

कोल्हापूर - पंधरा-वीस वर्षांपूर्वी शहराच्या एका चिंचोळ्या गल्लीपुरता मर्यादित असलेल्या भारतीय जनता पक्षाचा विस्तार आता ग्रामीण भागापर्यंत पोचला आहे. पक्षाच्या विस्ताराला बळ देण्यासाठी उद्या (ता. २९) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गारगोटी (ता. भुदरगड) येथे येत आहेत. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पहिल्यांदाच गारगोटीत येत असल्याने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. 

सोमवारी दुपारी चार वाजता गारगोटीतील पोलिस मैदानावर होणाऱ्या शेतकरी मेळाव्यात श्री. फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यातच काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचे पुत्र व माजी जिल्हा सदस्य राहुल देसाई हे भाजपमध्ये कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार आहेत. भुदरगड, राधानगरी तालुक्‍यांत देसाई गटाचा मोठा प्रभाव आहे. राहुल यांच्या पक्षप्रवेशाने भाजपला मोठी ताकद या दोन तालुक्‍यांत मिळेल, असा अंदाज आहे. 

यापूर्वी राष्ट्रवादीचे हातकणंगलेचे नेते व जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले, गगनबावड्याचे नेते पी. जी. शिंदे, काँग्रेसचे शिरोळ तालुकाध्यक्ष अनिल यादव, हातकणंगले तालुकाध्यक्ष प्रसाद खोबरे आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला. पुढील आठवड्यात आजरा कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी हेही भाजपवासी होणार आहेत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील हेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तालुका पातळीवर आपआपले स्थान बळकट असलेल्या नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन भाजपकडून ग्रामीण भागात विस्ताराचा प्रयत्न सुरू आहे. या पक्षाला ग्रामीण चेहरा नाही, अशा होत असलेल्या टीकेला या नेत्यांचा पक्षप्रवेश हे उत्तर असेल. 

राहुल देसाई यांचे बंधू धैर्यशील हे ‘गोकुळ’चे संचालक आहेत. ‘गोकुळ’वर माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता आहे. या सत्तेच्या माध्यमातूनच श्री. देसाई यांचा भाजप प्रवेश होत आहे. राहुल यांचे आजोबा कै. आनंदराव देसाई, वडील बजरंग देसाई यांनी काँग्रेसचे आमदार म्हणून या भागाचे प्रतिनिधीत्व केले.

वारसांना पुढे करण्याची खेळी
माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी १८ वर्षे काँग्रेसचे आमदार म्हणून विधानपरिषदेत प्रतिनिधीत्त्व केले, पण २०१४ च्या निवडणुकीत त्यांचे पुत्र भाजपाचे आमदार झाले. बजरंग देसाई यांचीही स्थिती हीच आहे. त्यांनी आपल्या मुलाच्या माध्यमातून भाजपाचा आधार घेतला आहे. घरातील वारसदारांना पुढे करून दोन्ही काँग्रेसचे नेते भाजपावासी होत असल्याची ही उदाहरणे आहेत. 

आणखी काही जण भाजपात
जिल्ह्यातील दोन्ही काँग्रेससह शिवसेनेचेही काही नेते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. विधानसभेच्या तोंडावर शिवसेनेचे दोन आमदार भाजपाचे उमेदवार असतील अशी शक्‍यता आहे. खासदार धनंजय महाडिक यांची तर राष्ट्रवादीपेक्षा भाजपाशीच जवळीक वाढली आहे. श्री. महाडीक यांचे एक बंधू भाजपाचे आमदार, भावजय भाजपाच्या झेडपी अध्यक्षा हे चित्र पाहता तेही लोकसभेसाठी भाजपाचे उमेदवार असतील, असा अंदाज आहे.

Web Title: devendra fadnavis tour in gargoti