तिरूपतीला गेलेले आंबेवाडीचे भाविक पुरामुळे अडकले बेळगावात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

बेळगाव - कोल्हापूरजवळील आंबेवाडी गावातील 16 जण बेळगावात अडकले आहेत. बेळगाव महापालिका प्रशासनाने त्यांची निवासाची व्यवस्था जुन्या धारवाड रोडवरील साई मंगल कार्यालयातील निवारा केंद्रात केली आहे. तेथेच त्यांच्या भोजनाची व्यवस्थाही केली आहे. 

बेळगाव - कोल्हापूरजवळील आंबेवाडी गावातील 16 जण बेळगावात अडकले आहेत. बेळगाव महापालिका प्रशासनाने त्यांची निवासाची व्यवस्था जुन्या धारवाड रोडवरील साई मंगल कार्यालयातील निवारा केंद्रात केली आहे. तेथेच त्यांच्या भोजनाची व्यवस्थाही केली आहे. 

आंबेवाडी येथील नागरीक चार ऑगस्ट रोजी तिरूपतीला गेले होते. परतीच्या प्रवासात ते रेल्वेतून हुबळीला आले. हुबळी येथून बसने ते बेळगाव पर्यंत पोहोचलै. पण बेळगाव ते कोल्हापूर हा मार्ग बंद असल्यामुळे त्यांची अडचण झाली. तब्बल 16 जण असल्यामुळे रहायचे कोठे असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. अखेर त्यांनी निवारा केंद्रात आश्रय घेतला. 

गुरूवारी सकाळी ते सर्वजण धारवाड रोडवरील निवारा केंद्रात गेले. तेथील केंद्राची जबाबदारी असलेले महापालिका कौन्सिल सेक्रेटरी एच. बी. पिरजादे व गजानन कांबळे, मलिक गुंडप्पन्नावर, बाळकृष्ण पिसाळे यांनी त्यांची विचारपूस केली. निवारा केंद्रात राहण्याची व्यवस्था केली. या 16 जणांसोबत कोल्हापूर येथील आणखी काहीजण होते. त्यानी पंतबाळेकुंद्री येथे जाण्याचा निर्णय घेतला. कोल्हापूर जवळील आंबेवाडी हे गाव पंचगंगा नदीच्या पुराने वेढले आहे. तेथील बहुतेक सर्व कुटुंबांचे आधीच स्थलांतर झाले आहे. तेथील पूरस्थितीची माहिती या 16 जणांना होती. त्यामुळे त्यांनी बेळगाव येथेच थांबण्याचा निर्णय घेतला. पूरस्थिती कमी झाल्यावर व रस्ते खुले झाल्यावर कोल्हापूरला जाणार असे त्यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The devotees of Ambavadi who went to Tirupati got stuck in Belgaum