महास्वामींच्या मठात चोरी; दर्शनाला आलेल्या भाविकांचे मोबाईल गेले चोरीला

सकाळ वृत्तसेवा 
बुधवार, 17 जुलै 2019

- शेळगी येथील गौडगाव मठात खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. 

- यावेळी तीन भाविकांचे मोबाईल चोरट्याने लंपास केले.

- ही घटना मंगळवारी (ता. 16) गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडली. 

सोलापूर : शेळगी येथील गौडगाव मठात खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या दर्शनासाठी गेलेल्या तिघा भाविकांचे मोबाईल चोरट्याने लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता. 16) गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडली. 

यासंदर्भात अनिकेत तानवडे (वय 51) यांनी जोडभावी पेठ पोलिसात फिर्याद दिली आहे. तानवडे हे औद्योगिक सल्लागार आहेत. गुरुपौर्णिमेनिमित्त काल दुपारी अडीचच्या सुमारास शेळगी येथील गौडगाव मठात खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांचे दर्शन घेण्यासाठी पत्नीसह गेले होते. मठातील गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने तानवडे यांची नजर चुकवून त्यांच्या खिशातील पंधरा हजारांचा मोबाईल चोरला. तसेच सिद्धाराम यलशेट्टी यांचा पाच हजारांचा मोबाईल, विनायक गंगाधर बिंबळगी यांचा पाच हजारांचा मोबाईल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

'शेळगीतील गौडगाव मठात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. पोलिसांचा मठाच्या बाहेर बंदोबस्त होता. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने तिघा भाविकांचे मोबाईल चोरले आहेत. मठात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. चोरट्याचा शोध सुरु आहे.' 
- यशवंत केडगे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Devotees lost their phone while worshipping at a monastry