केवळ राजकीय स्वार्थापोटी ‘गोकुळ’ला टार्गेट - देसाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) ही एकच संस्था मल्टिस्टेट नसून जिल्ह्यातील अनेक संस्था या कायद्याखाली आहेत. असे असताना केवळ राजकीय स्वार्थापोटी ‘गोकुळ’ला टार्गेट करून संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत.

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) ही एकच संस्था मल्टिस्टेट नसून जिल्ह्यातील अनेक संस्था या कायद्याखाली आहेत. असे असताना केवळ राजकीय स्वार्थापोटी ‘गोकुळ’ला टार्गेट करून संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर खोटे आरोप केले जात आहेत.

संघ स्वतःच्या ताब्यात घेण्यासाठीच त्यांची धडपड सुरू असल्याची टीका संघाचे संचालक धैर्यशील देसाई यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता पत्रकाद्वारे केली आहे. आमदार पाटील यांनी काल पत्रकार परिषद घेऊन महादेवराव महाडिक यांच्यावर टीका केली होती. त्याला श्री. देसाई यांनी  पत्रकाद्वारे उत्तर दिले. 

आमचे नेते ठेकेदार आहेत, पण ते जिल्ह्याच्या विकासाचे ठेकेदार आहेत. ‘गोकुळ’ हा सहकारातील मानदंड व कोल्हापूरची अस्मिता आहे. संघामुळेच जिल्ह्यात अार्थिक सुबत्तता असून साखर कारखाने अडचणीत असताना सर्वसामान्य दूध उत्पादकांचा संसार हा ‘गोकुळ’मुळेच टिकून आहे. काल आमच्या नेत्यांवर कोणीतरी टीका केली, ही टीका राजकीय स्वार्थापोटी व वैयक्तीक द्वेषापोटी केलेली आहे, असे या पत्रकात म्हटले आहे. 
मल्टिस्टेटबाबत कोणतीही माहिती न घेता केवळ आरोप करण्याचे काम सुरू आहे. जी व्यक्ती एकेकाळी आमच्या नेत्यांच्या गाडीचा दरवाजा उघडत होती व ज्यांच्या आशीर्वादामुळे ते आज राजकीय क्षेत्रात आहेत आणि ज्यांनी शेतकरी आंदोलनावेळी शेतकऱ्यांवर सत्तेचा गैरवापर करून अत्याचार केला, त्यांना या विषयावर बोलण्याचा अधिकार 
नाही. 

कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांनी ‘गोकुळ’चा पाया रोवला व ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांच्या नेतृत्वाखाली ‘गोकुळ’चा दिसणारा नावलौकिक हा संघाचे नेते श्री.महाडिक व माजी आमदार पी. एन. पाटील यांच्यामुळेच केवळ राज्यात नव्हे, तर देशात दिसत आहे, याचे भान त्यांनी ठेवावे. 

श्री. महाडिक व संघावर आरोप करणाऱ्यांना संघाने केलेली प्रगती, शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा, बोनस, फरक बिल हे दिसत नाही. त्यांना केवळ राजकारण करायचे असून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताशी काही देणे-घेणे नाही. संघावर वारंवार आरोप करून ते  दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम करत आहेत.

सांगली जिल्ह्यातील एकही संस्था संघाची सभासद होणार नाही. त्यामुळे राजकीय हव्यासापोटी संघाला बदनाम करणाऱ्यांच्या नादाला दूध उत्पादकांनी लागू नये, असे आवाहनही पत्रकात केले आहे.

ते संचालक स्वकर्तृत्वाने निवडून आले
गेल्या निवडणुकीत आम्ही केवळ ५०-१०० मतांनी नव्हे, तर ४००-५०० मतांनी विजयी झालो आहोत. त्यांचे दोन उमेदवार हे स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आले आहेत, असा टोलाही या पत्रकात लगावला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhairayasheel Desai comment on issue of Gokul Multistate