धनगर आरक्षण : लाभासाठी आता आरपारची लढाई 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 जुलै 2019

अदिवासीच्या विकासासाठी एक हजार कोटींची तरतूद केली आहे. त्यातून धनगर समाजाला लाभ देण्यात येईल, असे हे सरकार सांगत आहे, मात्र ही सरकारची भूलथाप आहे, गेल्या वर्षीच्या पाचशे कोटी रूपयांतील काहीही खर्च धनगर समाजाच्या विकासावर केलेला नाही त्यामुळे आदिवासींच्या निधीचा लाभ धनगर समाजाला झालेला नाही त्यामुळे धनगर समाजाला आरक्षणाचाच लाभ द्यावा, असेही आमदार रूपनवर यांनी सांगितले.  

कोल्हापूर - " धनगर समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी 2014 पासून सरकारने खेळवत ठेवले आहे. मुख्यमंत्री, त्यांचे सहकारी वरिष्ठ मंत्री धनगर आरक्षणाबाबत काहीच बोलत नाहीत. त्यामुळे धनगर समाजात असंतोषाचे वातावरण आहे. आता आरपारची लढाई करावी लागेल. यासाठी येत्या 11 ऑगस्टला पंढरपूरमध्ये राज्यव्यापी मेळावा घेणार आहोत. त्यात धनगर समाजाने सहभागी व्हावे.'' असे आवाहन माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांनी येथे केले. 

महाराष्ट्र धनगर समाज महासंघातर्फे धनगर समाजाचा मेळावा शाहू मार्केट यार्डात घेण्यात आला.  यावेळी ते बोलत होते. 
चौंडी विकास प्रकल्पाचे शिल्पकार म्हणून श्री डांगे यांची ओळख आहे. त्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला याबद्दल तसेच आमदार रामहरी रूपनवर यांची विधान परिषदेच्या उपनेतेपदी निवड झाली याबद्दल धनगर समाज महासंघ व मल्हारसेने तर्फे दोहोंचे सत्कार झाले. 

श्री. डांगे म्हणाले की, ""धनगर समाजाला 1956 पासून सरकारने आरक्षणाचा लाभ दिलेला नाही. शासकीय पातळीवर धनगर आरक्षणाच्या नोंदी आहेत, धनगर समाज राजपत्र यादीत समाविष्ठ आहे. तरीही प्रत्यक्ष आरक्षणाचा लाभ दिला जात नाही आरक्षणाचा लाभ द्यावा यामागणीसाठी अनेकदा आंदोलन केली, लोकशाही मार्गाचा अवलंब केला मात्र त्याची दखल सरकारने घेतलेली नाही.'' 

आरक्षणाचा लाभ नसल्याने धनगर समाज आता आंदोलनावेळी कोणती दिशा घेईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे सरकारने आरक्षणाचा लाभ देण्याबाबत वेळीच निर्णय घ्यावा लागेल. याची दिशा ठरविण्यासाठी पंढपूरमध्ये राज्यव्यापी मेळावा येत्या 11 ऑगस्टला घेण्याचे निश्‍चित झाले आहे, असेही श्री. डांगे यांनी सांगितले 

यावेळी मल्हार सेनेचे बबन रानगे, बयाजी शेळके, शहाजी सिद, राघू हजारे, प्रल्हाद देबाजी, अंबाजी भेकरे, अलका गौडे, छगन नांगरे आदी उपस्थित होते. 

सरकारची भूल थाप 
अदिवासीच्या विकासासाठी एक हजार कोटींची तरतूद केली आहे. त्यातून धनगर समाजाला लाभ देण्यात येईल, असे हे सरकार सांगत आहे, मात्र ही सरकारची भूलथाप आहे, गेल्या वर्षीच्या पाचशे कोटी रूपयांतील काहीही खर्च धनगर समाजाच्या विकासावर केलेला नाही त्यामुळे आदिवासींच्या निधीचा लाभ धनगर समाजाला झालेला नाही त्यामुळे धनगर समाजाला आरक्षणाचाच लाभ द्यावा, असेही आमदार रूपनवर यांनी सांगितले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhanagar Reservation Annasaheb Dange comment