‘दक्षिण’स्वारीवरून महाडिक-मुश्रीफ संघर्ष

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जानेवारी 2017

कोल्हापूर -  राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून अंतर्गत धुमसणारा वाद जिल्हा परिषदेच्या निमित्ताने आता अधिकच चिघळला आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार मुश्रीफ यांच्यासमोरच कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसविरोधी सर्वपक्षीय मोट बांधण्याची घोषणा करून त्यांना थेट आव्हानच दिल्याचे मानले जाते. खासदारांच्या या घोषणेवर ते काहीच बोलले नाही, आज मात्र त्यांनी दक्षिणमध्ये काँग्रेससोबतच राष्ट्रवादी राहील, असे स्पष्ट केले, मात्र हे ऐकण्यासाठी खासदार महाडिक उपस्थित नव्हते.

कोल्हापूर पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर जिल्हा राष्ट्रवादीच्या पाठीशी राहिला आहे. राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हा या पक्षाचे नेतृत्व सदाशिवराव मंडलिक यांच्याकडे होते. त्या वेळी मुश्रीफ व मंडलिक एकत्र होते. 

आमदार मुश्रीफ यांनी मंडलिकांची साथ सोडली. त्या वेळच्या राजकीय परिस्थितीमुळे मंडलिक यांना राष्ट्रवादीतून बाहेर जावे लागले. त्या वेळी बाबा कुपेकर ज्येष्ठ होते, तरीही पक्षाचे जिल्ह्याचे नेतृत्व आमदार हसन मुश्रीफांकडे आले. गत लोकसभेच्या निवडणुकीत धनंजय महाडिक यांना राष्ट्रवादी घेण्यात आणि आमदार सतेज पाटील यांच्या निवासस्थानी नेऊन त्यांच्यामध्ये समेट घडविण्याचा प्रयत्नही आमदार मुश्रीफ यांनीच केला.

आमदार मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांचे स्थानिक राजकारणात चांगले संबंध आहेत. आमदार पाटील व महाडिक यांचे संबंध सर्वांनाच माहीत आहेत. त्यामुळे खासदार महाडिक हे आमदार मुश्रीफ यांच्यापासून तसे हात राखूनच राहत होते. विधान परिषदेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे आमदार मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांना मदत केल्यामुळे आमदार मुश्रीफ व खासदार महाडिक यांच्यातील दरी आणखी वाढली. त्यानंतर झालेल्या पालिका निवडणुकीत खासदार महाडिक पक्ष उमेदवारांच्या प्रचारात फारसे दिसले नाहीत. त्यांच्यामध्ये अंतर्गत धुसफूस सुरूच होती. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर ती चव्हाट्यावर आली. काल मुश्रीफ यांच्याशेजारी बसून खासदार धनंजय महाडिक यांनी दक्षिणमध्ये काँग्रेसविरोधात सर्वपक्षीय मोट बांधण्याची घोषणा करून त्यांना एकप्रकारे आव्हानच दिले.

याचवेळी आमदार संध्योदवी कुपेकर यांनीही राष्ट्रवादीचे उमेदवार अडचणीत येऊ नयेत म्हणून  चंदगडमध्ये भाजपशी युती करावी लागणार असल्याचे सांगितले. यावर त्या वेळी आमदार मुश्रीफ यांनी मौन बाळगले; मात्र आज त्यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. खासदार महाडिक यांच्या विरोधात थेट भूमिका घेत कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेससोबत राष्ट्रवादी आघाडी करेल, असे सांगितल्यामुळे आमदार मुश्रीफ विरुद्ध खासदार महाडिक यांच्यातील संघर्ष आता चांगलाच चिघळणार आहे. 

वाद वाढण्याची चिन्हे
आमदार हसन मुश्रीफ यांनी आजपर्यंत आपले स्थान राखण्यासाठी प्रत्येक निवडणुकीत कागलमध्ये अनेकवेळा स्वत:ला सोयीच्या असणाऱ्या भूमिका घेतल्या आहेत. त्याच पद्धतीने आता खासदार महाडिक भूमिका घेत आमदार मुश्रीफ यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे यापुढे जिल्ह्यात खासदार महाडिक व आमदार मुश्रीफ यांच्यातील वाद गाजण्याची चिन्हे आहेत.

Web Title: dhananjay mahadik hasan mushrif political dispute