पावसासाठी धनगर समाजाची दिंडी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

शिर्डी : दुष्काळाचे सावट, पिके करपली, शेतकरी चिंतेत पडले. त्यांची चिंता दूर व्हावी, पाऊस पडावा, दुष्काळ हटावा, यासाठी येथून साडेसातशे किलोमीटरवरील कर्नाटकातील घोडेगिरी येथील बिरोबा देवाला कौल लावण्यासाठी येथील धनगर समाजातील शंभरांहून अधिक भाविक आज रवाना झाले. आखूड धोतर, डोक्‍यावर पागोटे, अंगात बंडी व खांद्यावर घोंगडे, अशा परंपरागत वेशात हे पदयात्री पुढील 15 दिवसांत तेथे पोचतील. तेथे डफांचा खेळ करून पावसासाठी देवाला साकडे घालणार आहेत.

डफांच्या गजरात भाविकांचा जथ्था आज येथून घोडेगिरीकडे रवाना झाला. नगर, दौंड, बारामती, फलटण, दहिवडी, विटा, तासगाव ते घोडेगिरी असा त्यांचा प्रवासाचा मार्ग आहे. वाटेत ठिकठिकाणचे ग्रामस्थ त्यांचे स्वागत करून पावसासाठी देवाला साकडे घालणार आहेत. परंपरागत वेषभूषा परिधान केलेल्या भाविकांच्या या दिंडीचे शहरात आगमन होताच त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. "बोल बिरोबा की जय'च्या गजरात दिंडीचे स्वागत करण्यात आले.

शेतात करपलेली पिके आणि कोरड्या विहिरी पाहून जीव तीळ तीळ तुटतो. देवाने दया करावी. पावसाला सांगावा धाडावा. दुष्काळ दूर व्हावा. देव दया करील, आमची मागणी पूर्ण करील. या विश्‍वासाने सहकाऱ्यांसोबत पायी निघालो. 

- चांगदेव बनकर, सत्तर वर्षांचे पदयात्री 

Web Title: Dhangar community dindi for rain