तीन वर्षांपासून लोंबकळतोय पूल

तीन वर्षांपासून लोंबकळतोय पूल

ढेबेवाडी - बनपुरी (ता. पाटण) येथील वांग नदीवर पिलर तुटल्याने लोंबकळणारा पायपूल तीन वर्षांपासून जागेवरच आहे. ये-जा थांबवण्यात आली असली तरी त्याच्याजवळ नदीपात्रामध्ये नागरिकांची सतत वर्दळ असल्याने पूल कोसळल्यास मोठ्या दुर्घटनेची भीती आहे. धोकादायक पूल जागेवरच ठेवून शासनाचा संबंधित विभाग दुर्घटनेची वाट पाहतो आहे की काय...? असा सवालही उपस्थित होत आहे.

नदीपात्र ओलांडण्यासाठी विभागातील काही गावांजवळ पायपुलांची उभारणी करण्यात आली आहे. दगड, वाळू आणि सिंमेटच्या साह्याने पिलर उभारून त्यावर लोखंडी अँगलमध्ये तयार केलेल्या पुलांचा सांगाडा बसविण्यात आला आहे. या पुलांवर डांबरी किंवा खडीचे रस्ते करणे शक्‍य नसल्याने त्याऐवजी लाकडी फळ्या बसविण्यात आल्या आहेत. फक्त पायी ये-जा करण्यासाठीच त्याचा वापर शक्‍य असल्याने असे पूल असणाऱ्या गावांकडील वाहतूक पावसाळ्यात बंदच ठेवून उन्हाळ्यात नदीपात्रातील पाणी कमी झाल्यावर कशीबशी सुरू राहात आहे. बनपुरीजवळील पुलाचीही अशीच गत होती. सुमारे ३५ वर्षांपूर्वी या पुलाची उभारणी झाल्याची माहिती मिळते. वांग नदीच्या दुतर्फा हे गाव वसले आहे. बनपुरीसह हनुमान वॉर्ड, भालेकरवाडी, कडववाडी, शिंगमोडेवाडी आदी वाड्यावस्त्यांतील नागरिक पाय पुलावरूनच ये-जा करायचे. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची संख्या जास्त असायची. त्यानंतर नदीवर वाहतुकीचा पूल झाला. मात्र, कमी उंचीमुळे तोही पावसाळ्यात अनेक दिवस पाण्याखाली राहत असल्याने त्यावरूनच ये-जा करण्याशिवाय किंवा पाय पुलाचा आधार घेण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नव्हता. कमी उंचीच्या पुलावरून ये-जा करताना अनेकजण पुरातून वाहून गेल्याच्या घटनाही तिथे घडल्या. तीन वर्षांपूर्वी पाय पुलाचा नदीपात्रातील मुख्य पिलर अचानक खचून कलल्यामुळे तो कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती निर्माण झाल्याने तातडीने त्यावरील ये-जा थांबविण्यात आली. त्यानंतर वाहतुकीचा कमी उंचीचा जुना पूल पाडून त्यापासून जवळ नवीन जास्त उंचीचा पूल उभारण्यात आला. सध्या त्यावरूनच वाहतूक चालते. मात्र, तीन वर्षांपूर्वी पिलर तुटून धोकादायक बनलेला पायपूल हटविण्याचा विसर संबंधित विभागाला पडल्याने त्याच्या परिसरातील ये- जा करणारे नागरिक आणि जनावरांच्या जिवाला धोका कायमच आहे.

वापरात नसलेला धोकादायक पूल तीन वर्षांपासून जागेवरच ठेवल्याने निर्माण झालेल्या गंभीर स्थितीची संबंधित यंत्रणेने गांभीर्याने दखल घ्यावी. नदीपात्रात पूल कोसळून दुर्घटना घडण्यापूर्वीच त्यांनी डोळे उघडावेत.
- उज्ज्वला जाधव, सभापती, पाटण पंचायत समिती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com