धोम-बलकवडी धरणामुळे दिलासा

रमेश धायगुडे
बुधवार, 5 एप्रिल 2017

खंडाळा तालुक्‍यातील पाच गावांत टंचाईसदृश स्थिती आहे. मात्र, धोम-बलकवडीचे पाणी कालव्यात सोडल्याने बहुतांश गावांतील पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटेल. या वर्षी तालुक्‍यात कोठेही टॅंकर सुरू करावा लागेल, आशी स्थिती नाही.
- दीपा बापट (गटविकास अधिकारी, खंडाळा)

लोणंद - पिढ्यान्‌पिढ्या कायम दुष्काळ व वैराग वाळवंटाच्या झळा सोसणारा खंडाळा तालुका धोम-बलकवडीच्या पाण्यामुळे सुखावला आहे. धोम-बलकवडीचे पाणी तालुक्‍यात मुख्य कालव्यातून पोटपाट, ओढे, नाल्यांद्वारे तलावात सोडले जात असल्याने विहिरी व हातपंपांना पाणी टिकून आहे. परिणामी तालुक्‍यातील पाणीटंचाई स्थिती आटोक्‍यात आहे. नीरा-देवधर धरणाचे पाणीही येत्या काही दिवसांत येणार असल्याने तालुक्‍याचा दुष्काळ कायमचा पुसला जाईल. 

दरम्यान, नीरा-देवधरच्या कार्यक्षेत्रातील मधल्या टापूतील काही गावांना आत्तापासूनच पिण्याचे पाणी अपुरे पडू लागले आहे. खंडाळा तालुक्‍यात गेल्यावर्षी सहा गावांत पाणीटंचाई होती. तीन गावांना टॅंकरद्वारे पाणी पुरवावे लागले. यावर्षी वाढत्या उन्हाळ्यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ होण्याचे संकेत आहेत. पाच गावांत टंचाई जाणवण्याची शक्‍यता आहे. मात्र,कुठेही टॅंकर लावावा लागणार नाही, अशी स्थिती दिसते. वाघोशी, कराडवाडी, घाडगेवाडी, लिंबाचीवाडी, झगलवाडी, कर्नवडी, गुठाळवाडी, लोहोम, कन्हेरी या गावांत काही प्रमाणात टंचाईची स्थिती आहे. काही दिवसांत जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न भेडसावू शकतो. वाघोशीत पाइपलाइन व विहीर खोदून राबवलेली नवी योजनाही कुचकामी ठरू लागली आहे. या योजनेला लोडशेडिंगचाही फटका बसत आहे. या योजनेला शेतीऐवजी सिंगल फेज वाहिनीवरून वीज द्यावी, अशी मागणी सरपंच सौ. धायगुडे यांनी केली आहे. घाडगेवाडीतील ग्रामस्थांना सध्या एका हातपंपावरच तहान भागवावी लागत आहे. मात्र, धोम-बलकवडी धरणाच्या कालव्याला सोमवारपासून (ता. ३) पाणी सोडण्यात आल्याने घाडगेवाडीसह धोम-बलकवडी कालव्यानजीकच्या तळ गाठलेल्या व काही ठिकाणी पूर्णपणे पाणी अटलेल्या सार्वजनिक व खासगी विहिरांना पाणी वाढणार असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. तालुक्‍याच्या मधल्या टापूत नीरा-देवधरच्या कार्यक्षेत्रातील वाघोशी, कराडवाडी, शिवाजीनगर या गावांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागणार आहे.

दरम्यान, नीरा-देवधर कालव्याचे कालवा खोदाईचे काम वाघोशीपर्यंत पूर्ण झाले आहे. मोर्वेच्या हद्दीतील ओढ्यावरील पुलाचे काम गेल्या वर्षापासून धिम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे वाघोशीपर्यंत पाणी येण्यास अडचण होत आहे. या पुलाचे काम ३१ मार्चपूर्वी पूर्ण करून वाघोशीपर्यंत पाणी नेण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. प्रत्यक्षात या पुलाचे काम आजही अपूर्ण अवस्थेत आहे. पुलाचे काम होणार नसेल तर ओढ्यावर सिंमेटच्या पाइप टाकून पाणी पुढे आणण्याची मागणी वाघोशी व कराडवाडीतील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Dhom-balkavadi dam