‘रयत’च्या संशोधन केंद्राची गरुडभरारी

दिलीपकुमार चिंचकर
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

जिल्ह्यातील तसेच राज्याच्या विविध भागातील विद्यार्थी या केंद्रात आता संशोधन करत आहेत. येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मीनल कोळेकर हिने नुकतेच उपकरण संशोधित केले असून, वाहनमालक, चालकांना ते अत्यंत उपयोगी ठरणार आहे.

सातारा - आपल्या वाहनाचा वेग किती आहे. वाहनाची कागदपत्रे, वाहनाच्या बॅटरीची लेवल, मोटारीचे तापमान किती आहे आणि वाहन नेमके कोठे आहे, याची सर्व माहिती एकत्रित सांगणारा ‘डिजिटल स्पीडोमीटर डिस्प्ले’ येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील संशोधन केंद्रात मीनल कोळेकर या संशोधक विद्यार्थिनीने तयार केला असून, लवकरच हे उपकरण ग्राहकांना अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होऊ शकणार आहे. यासह विविध संशोधनांनी ‘रयत’चे संशोधन केंद्र भरारी घेऊ लागले आहे.

शतकमहोत्सवाचे औचित्य साधून ‘रयत’ने पुणे येथील टाटा टेक्‍नॉलॉजी, सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी पार्क आणि रुसाच्या माध्यमातून सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन अँड इन्क्‍युबेशन सेंटर (सीआयआयआय) उभारले आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक संकल्पनांना मूर्त स्वरुप देण्यासाठी आणि उद्योग विकासास चालना देण्यासाठी या केंद्राचा आता चांगला उपयोग होत असल्याचे समोर येऊ लागले आहे. या सेंटरमध्ये संशोधक विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील तसेच राज्याच्या विविध भागातील विद्यार्थी या केंद्रात आता संशोधन करत आहेत. येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील मीनल कोळेकर हिने नुकतेच उपकरण संशोधित केले असून, वाहनमालक, चालकांना ते अत्यंत उपयोगी ठरणार आहे. तसेच ते अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होणार आहे. सध्या नवनव्या चारचाकी बाजारात येत आहेत. त्यामध्ये डिजिटल सुविधाही असतात. पण, त्या सर्व एकत्र नसतात किंवा काही नसतातही. कोळेकरने वाहनात कमी जागेत (स्पिडोमीटरसारखा) बसणारा डिस्प्ले तयार केला आहे. या एकाच उपकरणात वाहनाचा वेग किती आहे. वाहनाची कागदपत्रे कोणती व आहेत का, बॅटरीची लेवल किती आहे, मोटारीचे सध्या तापमान किती आहे आणि वाहन नेमके कोठे आहे, मालकाची सर्व कागदपत्रे अशी सर्व माहिती कळणार आहे. या संशोधनाचे प्रात्यक्षिक तिने नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत सादर केले. त्यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, उद्योजक वसंतराव फडतरे, केंद्राचे प्रमुख प्रा. पंकज मुंदडा, टाटा टेक्‍नॉलॉजी पार्कचे तज्ज्ञ अनिल डोले उपस्थित होते. सर्वांनी मीनलचे कौतुक केले.

Web Title: Digital Speedometer Display Rayat Research Center Minal Kolekar