कोल्हापूर बाजारात मॅजिक दिव्यांसह विविध कंदीलही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

दिवाळीच्या निमित्ताने बाजारात विविध डिझाईन, रंगसंगती, आकार यासह विविध पणत्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. यात यंदा पारंपरिक कंदिलाला नवा लूक दिलेला आधुनिक कंदील लक्षवेधी ठरत आहे. तसेच मॅजिक दिवा व लॅम्प दिवा असे पणत्यांचे नवनवीन प्रकार बाजारात आहेत.

कोल्हापूर - दिवाळी म्हणजे दिव्यांचा लखलखाट, प्रकाशाचा झगमगाट. घराच्या दारापाशी, तुळशीजवळ लावण्यात येणाऱ्या दिव्यांमुळे दिवाळीत शहर उजळून निघते. दिवाळीच्या निमित्ताने बाजारात विविध डिझाईन, रंगसंगती, आकार यासह विविध पणत्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. यात यंदा पारंपरिक कंदिलाला नवा लूक दिलेला आधुनिक कंदील लक्षवेधी ठरत आहे. तसेच मॅजिक दिवा व लॅम्प दिवा असे पणत्यांचे नवनवीन प्रकार बाजारात आहेत.

मॅजिक दिव्याची रचना पूर्णपणे वेगळी आहे. यात उलट्या बाजूने तेल घालावे लागते. सात ते आठ प्रकारांत हा दिवा उपलब्ध आहे. आकर्षक डिझाईन्स व वेगळ्या रचनेमुळे ग्राहकांकडून त्याला अधिक पसंती मिळत आहे. लॅम्प दिवा आणखी एक नवा प्रकार विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. लॅम्प दिव्याची रचना ही थोडी वेगळ्या प्रकारची आहे. यातही तीन डिझाईन्स असून, याचा आकार नंदादीपासारखा आहे. हा दिवा विझू नये, याकरिता काचेची डिझाईन्स असलेले संरक्षण कवच आहे. याच्या आकर्षक सजावटीमुळे हा दिवा हातोहात विकला गेल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

पारंपरिक कंदिलाला आधुनिक ‘टच’ देत आधुनिक प्रकारचा कंदील बाजारात आला आहे. आकर्षक रंगसंगतीमुळे त्याला अधिक पसंती मिळत असल्याचे दिसते. जुन्या कंदिलामध्ये रॉकेल घालावे लागत होते. या कंदिलात मात्र बल्ब लावता येऊ शकतो. तसेच मेणबत्तीच्या प्रकाशानेही कंदील उजळतो. त्याचे हॅंगीगही मातीपासून तयार केले आहे. मातीच्या छोट्या छोट्या गोळ्यांची माळ हॅंगीगसाठी वापरली आहे. कोलकात्यावरून आलेल्या या विविध डिझाईन्स आणि रंगसंगतीतील पणत्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. यांची किंमत साधारण १५० रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत आहे.

पारंपरिक पणत्यांनाही मागणी
दिवाळीत भरघोस मागणी असलेल्या पणत्यांचे रूपडे गेल्या काही वर्षांत बदलले. असे असले तरी पारंपरिक पणत्यांची मागणी कमी झालेली नाही. कोयरी, चौकोनी, षटकोनी, पान, मोर, हत्ती, बदाम, फुले, कमळ, तुळशी वृदांवन अशा विविध आकारांतील आकर्षक पणत्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच झाडांच्यामध्ये असलेले, घरासमोर असलेल्या सरस्वती आणि गणपतीच्या मूर्तींसमोरील पणत्यांची रांग असलेली डिझाईनही  लक्षवेधी ठरत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dipawali Special story on Magic lamps and lanterns