एनडीआरएफतर्फे तरुणांना आपत्ती व्यवस्थापनचे धडे 

SGI20A13416.jpg
SGI20A13416.jpg

सांगली : एनडीआरएफतर्फे पूरग्रस्त गावातील तरुणांना आपत्ती व्यवस्थापनचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. कृष्णा नदीत बोटींग, तसेच बुडणाऱ्या नागरिकांना वाचवून त्यांच्यावर प्रथमोपचार करणे याचे धडे दिले जात आहेत. महसूल विभागाच्या वतीने रॉयल कृष्णा बोट क्‍लबच्या माध्यमातून हे प्रशिक्षण सुरु आहे. 

सांगलीला गेल्या वर्षी महापुराचा फटका बसला होता. त्यावेळी एनडीआरएफच्या पथकांना मदतीसाठी बोलवण्यास विलंब लागल्याने नागरिकांना वेळेत मदत करण्यात अडचणी येत होत्या. कृष्णा काठावरील शंभरावर गावांना पुराच्या पाण्याने वेढल्याने सुमारे तीन लाख लोकांना त्याचा फटका बसला. ब्रम्हनाळ येथे एक बोट उलटून काही बुडण्याची दुर्घटनाही घडली होती. वेळेत आर्मी, एनडीआरएफची मदत बोलवण्यात प्रशासनाने दिरंगाई केल्याचा आरोप झाला होता. 

यंदाही हवामान खात्याने चांगल्या पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. त्यामुळे पुराचा धोका आहे. या संभाव्य महापुराला तोंड देण्यासाठी प्रशासनाने यंदा चांगलीच तयारी चालवली आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावर्षी एनडीआरएफची पथके लवकर बोलवण्यात येतील असे आश्‍वासन दिले आहे. तसेच सुसज्ज बोटी, लाईफ जॅकेट, लाईफ रिंग यांचीही सज्जता करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुराचा फटका बसणाऱ्या गावातील तरुणांनाही यावेळी प्रशिक्षण देण्यात येत आहे. 

मिरज प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या कृष्णा नदीच्या समर्थ घाटावर रोज प्रशिक्षण देण्यात येत आहे. तालुक्‍यातील पूराच्या क्षेत्रात येणाऱ्या गावातील स्वयंसेवी तरुणांचे गट करण्यात आले आहेत. प्रत्येक गावात असे किमान दहा ते वीसजणांचे गट आहेत. त्यांना या प्रशिक्षणासाठी बोलवण्यात येते. पुराच्या पाण्यात बोट कशी चालवावी, तिचे नियंत्रण कसे करावे याचे प्रशिक्षण दिले जात आहे. यावेळी लाईफ जॅकेट, लाईफ रिंगचा उपयोग कसा करावा हेही शिकवले जाते. तसेच बुडणाऱ्या व्यक्तीस वाचवल्यानंतर प्रथमोपचार कसे करावेत याचीही माहिती देण्यात येत आहे. 

रॉयल कृष्णा बोट क्‍लबचे दत्ता पाटील, एनडीआरएफचे पवन शर्मा यांच्यासह त्यांचे सहकारी या प्रशिक्षणात तरुणांना मार्गदर्शन करत आहेत. आज या प्रशिक्षणास प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार रणजीत देसाई, सांगलीचे मंडल अधिकारी श्रीकांत तारळेकर, मिरजेचे मंडल अधिकारी कबीर सुर्यवंशी, सांगली तलाठी के. बी. धस, मिरज तलाठी प्रकाश पांढरे, बेडग तलाठी प्रवीण जाधव, हरिपूर तलाठी एस. एस. श्रीपती पाटील, सांगलीवाडी तलाठी कविता दाभाडे आदी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com