आटपाडी तालुक्यात डाळिंबाला यंदा जबर फटका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

आटपाडी - भीषण पाणी टंचाई, तेल्या आणि ओला करप्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा डाळिंबाला फटका बसणार आहे. प्रतिवर्षी तीनशे कंटेनर उत्पादन क्षमतेच्या या तालुक्‍यात यंदा शंभरावर कंटेनरच निघतील असा अंदाज वर्तवला जात आहे. गज वादळाच्या झटक्‍याने स्थानिक बाजारात डाळिंबाचे दर घसरले आहेत.

आटपाडी - भीषण पाणी टंचाई, तेल्या आणि ओला करप्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा डाळिंबाला फटका बसणार आहे. प्रतिवर्षी तीनशे कंटेनर उत्पादन क्षमतेच्या या तालुक्‍यात यंदा शंभरावर कंटेनरच निघतील असा अंदाज वर्तवला जात आहे. गज वादळाच्या झटक्‍याने स्थानिक बाजारात डाळिंबाचे दर घसरले आहेत.

टेंभूच्या पाण्यामुळे गेल्या पाच वर्षांत तालुक्‍यात डाळिंबाचे क्षेत्र झपाट्याने वाढत असून सुमारे वीस हजार एकरांवर लागवड झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेवबरोबरच दुबई, सौदी अरेबीय देशांमध्ये डाळिंबाला चांगली मागणी असते. त्या दृष्टीने शेतकरी दर्जा वाढवत आहेत. यावर्षी मात्र डाळिंबाची वाट बिकट झाली आहे. यंदा पावसाने दडी मारली. त्यामुळे विहिरीची पाणीपातळीत घट झाली. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली.

पुरेशी पाणी व्यवस्था नसलेल्या किमान पाच ते सात हजार एकर क्षेत्राला फटका बसल्याचे बोलले जाते. त्यामुळे कूपनलिकांची खोदाई करून नशीब आजमावले जात आहे. टॅंकरचा आधार घेऊन बागा जोपासल्या जात आहेत. पाण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. गेल्या आढवड्यात गज वादळाने झालेल्या अवकाळी पावसाचा थोडा दिलासा मिळाला. 

तथापि सध्या तेल्या आणि ओला करपा रोगाची साथ दिसत आहे. थंडीऐवजी उन्हाचा कडाका वाढल्यामुळे तेल्याचे पाय पसरले आहेत. त्याहीपेक्षा करपा भयानक रोग आहे. पावसाचा जास्त ओलावा झाल्यामुळे करपा  रोग बहुतांश बागात आला आहे. दोन-चार दिवसांत  संपूर्ण बाग या रोगाने व्यापली जाते. या रोगाचे फळावर डाग पडत आहेत. विक्रीयोग्य फळ राहत नाही. जवळपास पाच ते सात हजार एकरक्षेत्र या रोगाने व्यापले आहे. प्रचंड नुकसान होत आहे. 

वादळाचा फटका
तमिळनाडूतील गज वादळाने डाळिंबाचे दर वीस ते तीस रुपयांनी कोसळले आहेत. यामुळे दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांची आणखी होरपळ झाली आहे. गेल्या महिन्यापासूनच तुरळक विक्री सुरू झाली होती. त्यावेळी चांगल्या मालाला सरासरी सत्तर रुपये भाव होते. दिवाळीत फळाची मागणी कमी होते. त्यामुळे फळबाजारात मंदी येते. त्यावेळी डाळिंबाचे वीस ते तीस रुपयांनी दर कमी झाले होते. सध्या चांगल्या डाळिंबाला सरासरी चाळीस रुपये भाव चालू आहे. व्यापारी या भागात फिरू लागले आहेत मात्र वादळाचे कारण सांगून चाळीस ते पंचेचाळीस रुपयावर भाव देत नाहीत.

पावसानंतर करपा रोग आला आणि दोनच दिवसात साऱ्या बागेत फैलाव झाला. जबर नुकसान झाले आहे. पंचनामे करून हेक्‍टरी नुकसान भरपाई द्यावी.
- राहुल गायकवाड 

(शेतकरी, शेटफळे)

Web Title: disease on Pomegranate in Atapadi Taluka