गणपूर्तीअभावी सभा रद्दची पन्हाळा नगराध्यक्षांवर नामुष्की 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

पन्हाळा नगरपालिका सभेकडे सत्तारूढ जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उपनगराध्यक्षा मुजावर यांच्यासह तब्बल 9 सदस्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे नगराध्यक्षांवर अपेक्षित गणपूर्तीअभावी सभा रद्द करणेची नामुष्की ओढवली. 

आपटी - पन्हाळा नगराध्यक्षा रुपाली धडेल यांनी सन 2019 - 2020 या सालात करावयाच्या नवीन कामांची निवड करणे, कामांच्या निविदा काढणे, निधी वर्ग करणे, कामांना मुदतवाढ देणे यासारख्या महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी आज नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा बोलावली होती; पण सभेकडे सत्तारूढ जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उपनगराध्यक्षा मुजावर यांच्यासह तब्बल 9 सदस्यांनी पाठ फिरवली. त्यामुळे नगराध्यक्षांवर अपेक्षित गणपूर्तीअभावी सभा रद्द करणेची नामुष्की ओढवली. 

मागील सभा 18 फेब्रुवारीला झाली होती. त्यानंतर गेली पाच महिने सर्वसाधारण सभा झाली नव्हती. त्यापैकी दोन महिने लोकसभेच्या आचारसंहितेत गेले. त्यामुळे नगराध्यक्षा धडेल यांनी बोलावलेल्या आजच्या सभेला महत्व आले होते.

या सभेपुढे 12 व्या व 13 व्या वित्त आयोगातील शिल्लक निधी नगरपरिषद निधीमध्ये वर्ग करणे, शहराच्या स्वच्छता कामाच्या मुदतीबाबत निर्णय घेणे, शहरात विविध ठिकाणी आयलॅंड उभारणे, कामाच्या वार्षिक निविदा मागविणे यासारखे महत्वपूर्ण 18 विषय चर्चेसाठी ठेवले होते. पन्हाळा शहराची स्वच्छता करण्यासाठी मक्तेदाराला ठेका दिला आहे.

या कामाच्या ठेक्‍याची मुदत डिसेंबर 2018 मध्ये संपली आहे; पण नवीन निविदा न काढल्याने मागील सभेत मार्चअखेरपर्यंत जुन्याच ठेकेदाराला मुदत वाढ दिली होती. त्यानंतर मुदत वाढ न मिळाल्याने ठेकेदाराने गेली दोन ते तीन महिने कामगार पगार दिलेले नाहीत. त्यामुळे शहराची स्वच्छता करणाऱ्या या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

या कामाच्या मुदत वाढीचा विषयही या सभेपुढे होता. असे महत्वाचे विषय असतानाही सत्तारूढ गट सभेच्या गणपूर्तीसाठी आवशक असलेले सहा सदस्यही सभागृहात हजर ठेऊ शकला नाही. उपनगराध्यक्षा यास्मिन मुजावर यांनीही सभेकडे पाठ फिरवली. तर सभेला सत्तारूढ गटाचेच संख्याबळ नसल्याने विरोधी पक्ष नेते आसिफ मोकाशी यांच्या सदस्यांनी सभागृहात जाणे टाळले. 

जनसुराज्यच्या नगरसेवकांत कलह? 
सभागुहात नगराध्यक्षा धडेल यांच्यासह चैतन्य भोसले, दिनकर भोपळे, तेजस्विनी गुरव, सुशीला गायकवाड व स्वीकुत सदस्य रविंद्र तोरसे असे सहा जण हजर होते. पण तोरसे स्वीकठत सदस्य असल्याने त्यांना गणपूर्तीसाठी जमेस धरता येत नसल्याने ही सभा रद्द करावी लागली. त्यामुळे सत्तारूढ जनसुराज्यच्या नगरसेवकांत कलहाला सुरवात झाली आहे काय? असा सवाल पन्हाळावासीयांना पडला आहे. 

पुनरावृत्ती होणार काय ? 
मागील सभागृहात आसिफ मोकाशी नगराध्यक्ष असताना जशा प्रकारे सभा रद्द होऊन विकासकामे रखडली होती त्याचीच पुनर्रावृत्ती होऊन पुन्हा शहराच्या विकासाला खीळ बसणार का ? अशीही चर्चा नागरिकांत सुरू आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dismissal of meeting due to absence of nomination