उदयनराजे- रामराजे संघर्ष विकोपाला; शरद पवारांची शिष्टाई निष्फळ

उदयनराजे- रामराजे संघर्ष विकोपाला; शरद पवारांची शिष्टाई निष्फळ

मुंबई : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील भांडण मिटविण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज अपयश आले. संतप्त झालेले उदयनराजे बैठकीतून तावातावाने निघून गेले. बाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी रामराजे यांच्यावर सडकून टीका केली. रामराजेंच्या वयाचा विचार करून थांबलो; त्यांच्या जागी अन्य कोणी असते, तर जीभ हासडली असती, असे ते म्हणाले. रामराजेंना अन्य कोणत्या पक्षात जायचे असेल, तर त्यांनी जरूर जावे; पण जाताना माझ्यावर खापर का फोडत आहात, असा सवाल त्यांनी केला. बैठकीनंतर बाहेर आलेल्या रामराजेंनी पत्रकारांशी बोलणे टाळले. "नो कमेंट' असे म्हणत ते निघून गेले. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी मात्र आपण आपली अस्वस्थता बैठकीत मांडल्याचे नमूद केले. 

नीरा कालव्याच्या पाण्यावरून खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. हा वाद शमावा, यासाठी शरद पवारांनी शनिवारी मुंबईत ही बैठक बोलावली होती. उदयनराजे हे चिडून बैठकीतून बाहेर पडल्याने त्यांच्यातील वादावर तोडगा निघू शकला नाही. नीरा- देवघर धरणाच्या पाण्यावरून राजकारण तापलेले असताना उदयनराजे भोसले यांनी 14 वर्षे बारामती- इंदापूरला जादा पाणी देण्यावरून रामराजे नाईक निंबाळकरांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर या टीकेला उत्तर देताना रामराजेंनी उदयनराजेंना लक्ष्य केले. स्वयंघोषित छत्रपती, चक्रम असे शब्दप्रयोग त्यांनी उदयनराजेंबाबत वापरले होते, तसेच पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे उदयनराजेंना आवरा; अन्यथा पक्षातून बाहेर पडू, असा इशारा दिला होता. त्यामुळे हा वाद अधिक विकोपाला जाऊ नये, यासाठी पवारांनी मुंबईत शनिवारी दुपारी या दोन्ही नेत्यांना चर्चेसाठी बोलावले होते. 

मात्र, बैठक सुरू झाल्यानंतर काही वेळातच चिडलेले उदयनराजे बैठकीतून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी थेट पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, "रामराजेंनी माझ्यावर स्वयंघोषित छत्रपती अशी टीका केली. मी स्वयंघोषित छत्रपती नाही. लोकांनी त्यांच्या मनात मला ते स्थान दिले आहे. छत्रपतींच्या घराण्याचा मी कधीही वैयक्तिक स्वार्थासाठी वापर केला नाही. रामराजेंनी मला चक्रमही म्हटले, हो मी चक्रम आहे. लोकांवर अन्याय होत असेल तर मी चक्रम होतो. मला अन्याय सहन होत नाही. त्यामुळे मी स्वपक्षीयांवरही बोलतो. त्याला घरचा आहेरही म्हटले जाते; परंतु मी घाबरत नाही.'' 

उदयनराजे पुढे म्हणाले, की तुम्ही सभापती आहात ना, तर तसे वागा. कुणाला काय बोलायचंय ते बोलून घ्या, पुढचं नंतर बघू. 

"आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर हे माझे मित्र आहेत. इतर पक्षांतील व्यक्तींशी मैत्री करायची नाही का? शरद पवार, अजितदादा, रामराजे यांचे इतर पक्षांत मित्र नाहीत का,'' असा सवाल करत त्यांनी या वेळी खालच्या शब्दांत रामराजेंवर हल्लाबोल केला. 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. विधानसभेच्या तोंडावर पक्षांतर्गत वाद योग्य नाही. यावर एकत्र बसून सर्वांनी तोडगा काढावा, अशी सूचना केली. 

उदयनराजे म्हणाले... 
- आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत 
- रामराजेंनी समोर येऊन बोलावे 
- आझाद मैदानावर आपली चर्चेची तयारी 
- माझे काय चुकले, हे मी पवार साहेबांना विचारले 
- नीरा- देवघरप्रश्‍नी शासनाकडील नोंदींची माहिती मी लोकांना दिली, त्याचा रामराजेंना राग का यावा? 
- पवार साहेबांनी काय तो निर्णय घ्यावा 

शिवेंद्रसिंहराजेंची तक्रार? 
या बैठकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या त्रासाबद्दल तक्रारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, ही बैठक संपल्यानंतर शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंचे नाव न घेता आपली अस्वस्थता सांगितली. लोकसभेनंतर वेगळ्या प्रकारचे वातावरण माझ्या मतदारसंघात बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्षांतर्गत त्रास देण्याचा प्रयत्न आहे. हे सगळे पवारांसाहेबांना सांगितले आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. 

आमदार शशिकांत शिंदे आणि त्यांचे बंधू ऋषिकांत हे माझ्या सातारा मतदारसंघात हस्तक्षेप करत असून, आमदार शिंदे हे साताऱ्यातून निवडणूक लढणार आहेत, अशा वावड्या त्यांच्या स्वीय सहायकाकडून उठविल्या जात आहेत. यावर आपण तातडीने आमदार शिंदे यांच्याशी बोलतो, असे शरद पवार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com