राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीवरून भाजपमध्ये मतभेद

विकास कांबळे : सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार, माजी खासदारांच्या वारसांनी स्थानिक पातळीवर केलेल्या आघाड्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मान्यता दिली, मात्र या आघाडीला केवळ गटापुरती मान्यता दिली आहे, अन्य ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष भाजपच्या विरोधात ठाकणार असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादीने काही ठिकाणी कॉंग्रेससोबत, तर काही ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी भाजपसोबत आघाडी केली. ही आघाडी करताना तालुक्‍यात स्थानिक पातळीवर आघाडी असणार आहे, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात माने यांची ही आघाडी हातकणंगले तालुक्‍यातील केवळ दोन गटांमध्ये असणार आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी आपला उमेदवार उभा करणार नाही, मात्र हातकणंगले तालुक्‍यातील अन्य आठ-नऊ गटांमध्ये राष्ट्रवादी पक्ष भाजपच्या विरोधात आपले उमेदवार उभे करणार आहे. भाजप व राष्ट्रवादीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत रेंदाळ मतदासंघातून दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या कन्या नंदाताई बाभूळकर यांनीही चंदगडमध्ये याच पद्धतीने स्थानिक पातळीवर आघाडी केली. या ठिकाणी दोन जागा कुपेकर गटाला मिळणार आहेत. या ठिकाणीही आघाडी असणाऱ्या केवळ दोन गटांमध्येच राष्ट्रवादी आपले उमेदवार उभे करणार नाही. अन्य ठिकाणी मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार उभे राहणार आहेत.

राष्ट्रवादीचे नेते तालुका पातळीवर आघाड्या करण्यासाठी अजूनही संबंधितांशी चर्चा करत आहेत. आजरा तालुक्‍यातील जिल्हा परिषद मतदारसंघापैकी एका ठिकाणी कॉंग्रेससोबत आघाडी करण्यात आली आहे. दोन ठिकाणी स्वबळावर लढणार आहेत. शिरोळ तालुक्‍यात कॉंग्रेससोबत आघाडी करण्याचा निर्णय झाला असून, तेथील जागा वाटपाचा फॉर्म्युलाही निश्‍चित झाला असल्याचे समजते. गडहिंग्लज तालुक्‍यात राष्ट्रवादी स्बळावर लढणार आहे. हातकणंगले तालुक्‍यात माने गटाने दोन ठिकाणी आघाडी केलेले मतदारसंघ वगळता अन्य ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस भारतीय जनता पक्षाच्या विरोधात घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणार आहे.

आघाडी न केलेलीच बरी
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या भूमिकेमुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे. अशी आघाडी करण्यापेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी न केलेलीच बरी, असा सूर कार्यकर्त्यांमधून येऊ लागला आहे.

Web Title: disputes in BJP because NCP alliance