जिल्ह्यात 44 पाणी टाक्‍या धोकादायक 

जिल्ह्यात 44 पाणी टाक्‍या धोकादायक 

सातारा - ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणाऱ्या पाणी साठवण टाक्‍यांची धोकादायक अवस्था असल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या तपासणीत आढळून आले आहे. त्यापेक्षाही भयावह म्हणजे ऑगस्ट 2016 मध्ये जिल्ह्यातील 44 धोकादायक टाक्‍या पाडून नवीन टाक्‍या उभारण्यासाठी सहा कोटींची मागणी केली असता त्याकडे अद्यापही शासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे 1975 मध्ये बांधकाम केलेल्या काही टाक्‍यांतून धोकादायकरीत्या पाणीपुरवठा सुरू आहे. 

तांबवे (ता. कऱ्हाड) येथील पाण्याची टाकी धोकादायकरीत्या कोसळल्यानंतर प्रशासनासह लोकप्रतिनिधींनाही जाग आली. त्यापूर्वीपासून ही धोकादायक टाकी पाडून नव्याने टाकी बांधण्याची मागणी होत असताही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र, तांबवे येथील घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या सभेत वादंग उठले. त्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने धोकादायक उंच साठवण टाक्‍यांची तपासणी केली. त्यात 44 टाक्‍या धोकादायक असून, त्या 

वापरायोग्य नसल्याचे समोर आले. मसूर, सुपने येथील टाक्‍यांचे तर 1975 मधील बांधकाम असून, त्यांची चाळीशी ओलांडली आहे. मसूरची टाकी अडीच लाख लिटर क्षमतेची, तर सुपनेची टाकी 50 हजार लिटर क्षमतेची आहे. वडूजमधील टाकी साडेतीन लाख लीटर, तरडगावची टाकी दोन लाख लिटर क्षमतेची आहे. या टाक्‍या नव्याने बांधण्यासाठी सहा कोटी 39 लाखांची आवश्‍यकता आहे. त्याबाबतचा प्रस्ताव पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांकडे ऑगस्ट 2016 मध्ये पाठविला होता. राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमात हा आराखडा समाविष्ठ करत येत नाही. त्यामुळे शासनस्तरावरून त्यास निधी मिळणे अत्यावश्‍यक आहे. सातारा जिल्हा भूकंप प्रवण क्षेत्रात असल्याने या टाक्‍यांना कधीही धोका पोचून जीवित्त, वित्तहानी होऊ शकते. 

...तर निधीचा मार्ग मोकळा 

राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत 2017-18 साठी 37 कोटींचा आराखडा बनविला आहे. त्याला केंद्र व राज्य शासनाची मंजुरी आवश्‍यक आहे. त्यामध्ये या टाकींच्या निधींचाही समावेश असल्याने या आराखड्यास मंजुरी मिळाल्यास धोकादायक टाक्‍यांची प्रश्‍न मार्गी लागेल. त्यासाठी मेपर्यंत वाट पाहावी लागेल. 

धोकायदायक टाकींची गावे 

मसूर, सुपने, म्हासोली, वडगाव हवेली, करवडी (ता. कऱ्हाड), सासुर्वे, सुर्ली, पाडळी, नायगाव, ल्हासुर्णे, तारगाव, न्हावी बुद्रुक (ता. कोरेगाव), पेट शिवापूर, तारळे, बांबवडे, चोपदारवाडी, बाचोली, सांगवड (ता. पाटण), जांब, चिंधवली, आसले गावठाण, पाचवड (ता. वाई), कुसवडे, कळंबे, रेनावळे, मांडवे, चिंचणेर संमत लिंब, निसराळे, खेड (ता. सातारा), तरडगाव, आदर्की बुद्रुक, सुरवडी, शिंदेवाडी, मुरूम, सोमंथळी, दुधेबावी (ता. फलटण), कोपर्डे, खेड बुद्रुक (ता. खंडाळा), वडूज, कोकराळे, काळंबी (ता. खटाव), बनगरवाडी, वाकी, दिवड (ता. माण). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com