मागितले १० कोटी, मिळाले १० लाख

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 डिसेंबर 2016

सांगली - जिल्हा बॅंकांना १० कोटी रुपयांचे चलन द्या, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी चेस्टला दिले असले तरी प्रत्यक्षात फक्त १० लाख रुपयेच मिळाले आहेत. बॅंकेच्या एकूण २१७ शाखा असून प्रत्येक शाखेला केवळ ४६०० रुपयेच हाती मिळणार असतील तर त्याचा उपयोग काय? असा सवाल करण्यात आला आहे. 

जिल्हा बॅंकेचे अधिकारी सोमवारी सकाळी बॅंक ऑफ इंडियामध्ये जाऊन बसले. दस्तूरखुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी फोन करून १० कोटी रुपये देण्याची सूचना केल्याने पैसे मिळतीलच, असा विश्‍वास त्यांना होता. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर अखेर केवळ १० लाख रुपये मिळतील, दुपारनंतर देऊ, असे सांगण्यात आले. तसाच निरोप बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आला. त्यावर डोक्‍याला हात लावण्यापलीकडे त्यांच्या हाती काहीच नव्हते. कारण बॅंकेचे दरवाजे उघडे असले तरी व्यवहार बंद आहेत.   

दरम्यान, या आर्थिक कोंडीच्या स्थितीत एक चांगली बातमीही येऊन धडकली. जिल्हा बॅंकेचे नोटबंदीनंतर बंद झालेले एटीएम कार्ड आता अन्य बॅंकांमध्ये वापरता येणार आहेत. ही प्रक्रिया बुधवारपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यासाठी नव्याने तांत्रिक बदल केलेले मास्टर कार्ड बॅंकेला पाठवण्यात आले आहेत. त्याआधारे तपासणी होईल, त्यानंतर ग्राहकांना अन्य बॅंकांतून पैसे काढता येणार आहेत. जिल्हा बॅंकेत सध्या ३१५ कोटी रुपयांची रोकड तशीच पडून आहे. १००० व ५०० रुपयांच्या या नोटा असून चेस्टमध्ये त्या भरून घेतल्या गेलेल्या नाहीत.

Web Title: district bank currency