जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ

Dam-Water
Dam-Water

सातारा - जून महिना संपत आला तरी मॉन्सूनचा पत्ता नसल्यामुळे सर्वांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला वीजपुरवठा करणाऱ्या कोयनेत ७.१५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. परिणामी दुष्काळी भागासह सर्वच तालुक्‍यांत आता पाणीटंचाईची तीव्रता आणखी वाढणार आहे. सधन तालुक्‍यातील काही गावांत एक दिवसाआड पाणी मिळत आहे.

जिल्ह्यात प्रमुख सहा धरणे असून, यावर्षी उरमोडी, कण्हेर, कोयना या धरणांचे पाणी दुष्काळी तालुक्‍यांना दिले आहे. सध्या जून महिना संपत आला तरी मॉन्सून पावसाचे आगमन झालेले नाही. केवळ कोकणात पाऊस आला, केरळमध्ये आला असे हवामान अंदाज ऐकून सातारा जिल्ह्यातील जनता आपल्याकडे पाऊस कधी सुरू होणार याची वाट पाहात आहेत.

त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना सुरवात झालेली नाही. सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पाऊस सुरू झाला, की पेरण्यांची कामे हाती घेतली जाणार आहेत. यावर्षी उन्हाळी एकही पाऊस झालेला नाही, परिणामी विहिरी कोरड्या आहेत, तसेच नदीलाही पाणी नसल्याने पात्रात बांधलेले बंधारेही मोकळे आहेत. जिल्ह्यातील प्रमुख धरणात यावर्षी प्रथमच इतक्‍या कमी प्रमाणात पाणी राहिले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरविणाऱ्या कोयना धरणात केवळ सात टक्के पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे, तसेच उरमोडीचे पाणी या वेळेस माण, खटाव तालुक्‍यांतील दुष्काळी भागाला देण्यात आले आहे, त्यामुळे धरणात अल्प पाणी उपलब्ध आहे. तारळी वगळता उर्वरित कोणत्याही धरणात पुरेसा पाणीसाठा नाही. धरणनिहाय आजचा पाणीसाठा व कंसात गेल्या वर्षी आजच्या दिवशीचा पाणीसाठा टीएमसीमध्ये असा आहे. कोयना ७.०३ (११.२३), धोम ०.०७ (१.२२), कण्हेर १.२८ (१.०९), धोम बलकवडी ०.११(०.०), उरमोडी ०.६४ (४.१७),  तारळी १.७२ (१.१६).

सध्या जून महिना संपत आला, तरी पावसाने सुरवात केलेली नसल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई सर्वच ठिकाणी भासू लागली आहे. सधन तालुक्‍यातील काही गावांत एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे आणखी आठ दहा दिवसांत पावसाने सुरवात केली नाही, तर भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत, तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन धरणांतील पाणी राखीव केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com