जिल्हा कारागृह हाऊसफुल्ल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

सांगली - येथील जिल्हा कारागृहातील कैद्यांची क्षमता २३५ इतकी असताना सध्या ३९३ कैदी आहेत. क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यामुळे कारागृह प्रशासनाला दररोजच कसरत करावी लागते. अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नियंत्रणावरील ताण थोडासा कमी झाला आहे. तरीही रोजची धावपळ ठरलेलीच आहे.

सांगली - येथील जिल्हा कारागृहातील कैद्यांची क्षमता २३५ इतकी असताना सध्या ३९३ कैदी आहेत. क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्यामुळे कारागृह प्रशासनाला दररोजच कसरत करावी लागते. अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे नियंत्रणावरील ताण थोडासा कमी झाला आहे. तरीही रोजची धावपळ ठरलेलीच आहे.

सांगलीतील कारागृह ब्रिटिशकालिन आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक घडामोडीचा साक्षीदार म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. कारागृह न्यायालयीन बंदी आणि तीन महिन्यांपर्यंत किरकोळ शिक्षा झालेल्या आरोपींसाठी आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत गुन्हेगारी वाढल्यामुळे विविध गुन्ह्यातील संशयित आरोपी पोलिस कोठडीनंतर जामीन मंजूर होईपर्यंत कारागृहात पाठवले जातात. तसेच अलीकडच्या काळात संशयित आरोपींच्या जामिनावर पोलिसांचे लक्ष केंद्रित असते. त्यामुळे जामिनासाठी कोणी अर्ज केला, की तत्काळ पोलिस अधिकारी म्हणणे सादर करून जामीन नाकारण्यास विनंती करतात. त्यामुळे कारागृहातील कैद्यांची संख्या वाढत आहे.

जिल्हा कारागृहातील पुरुष आणि स्त्री कैदी मिळून क्षमता २३५ इतकी आहे. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून चारशेंच्या आसपास ही संख्या असते. पाच-दहा जणांना जामीन मिळाला की अन्य गुन्ह्यात तेवढेच संशयित कारागृहात येतात. त्यामुळे कारागृहातील फलकावरील कैद्यांची संख्या सतत चारशेंच्या खाली आणि वर हलताना दिसते. आठवड्यापूर्वी ४०६ कैद्यांची संख्या होती. सध्या ३९३ इतकी संख्या आहे. यापैकी सुमारे दोनशे कैदी गंभीर गुन्ह्यातील आहेत.

क्षमतेपेक्षा १५० ते १६० कैदी कारागृहात असल्यामुळे अपुऱ्या संख्याबळावर त्यांच्यावर सतत नियंत्रण ठेवावे लागतात. त्यांच्यात भांडणे होऊ नयेत यापासून ते त्यांचे हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागते. 

कैद्यांना दररोज दूध-केळी, नाष्टा यापासून त्यांचे दोनवेळचे जेवण यासाठी स्वयंपाकघर सतत बारा तास सुरूच असते. तसेच अधून-मधून त्यांचे प्रबोधनही करावे लागते. कारागृहातील दैनंदिन व्यवहार म्हणजे उत्तम व्यवस्थापनाचा मोठा नमुनाच आहे. अद्ययावत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कैद्यावर सतत नजर असल्यामुळे ताण थोडासा कमी झाला आहे. तरीही कैद्यांची आणि कारागृहाची सुरक्षा पार पाडताना कसरत करावीच लागते.

...अन्यथा ४५० पर्यंत संख्या
गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये आतमध्ये संघर्ष होऊ नये म्हणून प्रशासन सतर्क असते. सांगलीतील दोन टोळ्यांना मोका लावला आहे. त्यांपैकी दोन्ही टोळ्या जिल्ह्याबाहेर स्वतंत्र कारागृहात आहेत. भ्रूणहत्या प्रकरणातील १३ संशयितही कळंबा येथे आहेत. यातील संशयित सांगलीत ठेवले असते तर ४५० चा आकडा गाठला असता.

Web Title: District Jail House full