अतिरिक्त पदभारामुळे जिल्हा प्रयोगशाळांवर ताण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 एप्रिल 2017

अन्न नमुना चाचणीची सुविधा फक्त 11 ठिकाणी
सोलापूर - राज्यातील तब्बल 22 जिल्हा प्रयोगशाळांचा कारभार अतिरिक्त पदभारावर सुरू आहे, त्यामुळे प्रयोगशाळांवर मोठा ताण पडत आहे. राज्यात अन्न नमुना चाचणीची सुविधाही फक्त अकरा ठिकाणी असल्याने त्याचाही मोठा परिणाम झाला आहे.

अन्न नमुना चाचणीची सुविधा फक्त 11 ठिकाणी
सोलापूर - राज्यातील तब्बल 22 जिल्हा प्रयोगशाळांचा कारभार अतिरिक्त पदभारावर सुरू आहे, त्यामुळे प्रयोगशाळांवर मोठा ताण पडत आहे. राज्यात अन्न नमुना चाचणीची सुविधाही फक्त अकरा ठिकाणी असल्याने त्याचाही मोठा परिणाम झाला आहे.

गृह विभागातर्फे सोलापुरात रासायनिक पृथक्‍करण प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. त्याचवेळी अन्न विषबाधा घटनेतील किंवा भेसळयुक्त अन्नधान्यातील सर्व नमुन्यांचे अणुजीवीय व रासायनिक विश्‍लेषण करणे व अन्न विश्‍लेषण करणे, तसेच अन्न विषबाधेतील कारणीभूत घटक शोधण्याचे काम मात्र अतिरिक्त पदभार देऊन करावे लागत आहे. उस्मानाबादच्या मुख्य अणुजीवशास्त्रज्ञांकडे सोलापूरचा, परभणीच्या अधिकाऱ्यांकडे लातूरचा, धुळ्याच्या अधिकाऱ्यांकडे नंदुरबारचा अशा एकूण 22 ठिकाणी अतिरिक्त अधिकाऱ्यांकडे पदभार देण्यात आला आहे.

प्रयोगशाळा असलेल्या मुख्यालयाच्या आसपास असलेल्या जिल्ह्यातील पाणी, अन्न व तत्सम तपासणीची जबाबदारीही या प्रयोगशाळांवर पडली आहे. यामध्ये केवळ राज्यातीलच शेजारच्या जिल्ह्यांतील तपासणीची जबाबदारी आहे. एका महिन्यात शहर व ग्रामीण भागातील सुमारे अडीच हजार नमुने तपासण्यासाठी येतात. याशिवाय ब्लिचिंग पावडर, तुरटी व अन्नाचे नमुनेही तपासण्यासाठी येतात. सोलापूरचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यावर सुरू असल्याने अडचणी येत आहेत. पाण्याच्या तपासणीनंतर ते पुनर्तपासणीसाठी पाठविण्यात येते. यात्रा आणि जत्रांच्या कालावधीत या विभागावर मोठा ताण पडतो.

आषाढी यात्रेत प्रयोगशाळा
आषाढी यात्रेत पालखी मार्गावर प्रयोगशाळा उभारली जाते, त्यामुळे जागेवरच शौच व पाण्याची तपासणी होण्याची सोय होते. सोलापूरच्या प्रयोगशाळेचे कामकाजही प्रभारी अधिकाऱ्यावर सुरू असल्याने यात्रा कालावधीत अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या प्रयोगशाळेत पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करण्याची मागणी होत आहे.

Web Title: district laboratories strain by additional charge