esakal | जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्र बसा आणि चाचपणी करा...

बोलून बातमी शोधा

District leaders sit together and test ...}

जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्या. जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्र बसा आणि चाचपणी करा, त्यानंतर अंतिम निर्णय घेऊ, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यानुसार येत्या रविवारी भाजप नेत्यांची बैठक घेण्याची प्राथमिक तयारी झाल्याचे सांगण्यात आले. 

जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्र बसा आणि चाचपणी करा...
sakal_logo
By
अजित झळके

सांगली : जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्या. जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्र बसा आणि चाचपणी करा, त्यानंतर अंतिम निर्णय घेऊ, अशी सूचना प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यानुसार येत्या रविवारी भाजप नेत्यांची बैठक घेण्याची प्राथमिक तयारी झाल्याचे सांगण्यात आले. 

महापौर बदलात काय होते ते पाहून जिल्हा परिषदेबाबत बैठक घेऊ, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले होते. महापौर निवडीत भाजपला मोठा दणका बसला. त्यामुळे जिल्हा परिषदेबाबत हालचाली झाल्याच नाहीत. त्यानंतर आग्रही सदस्यांनी खासदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्याकडे आग्रही मागणी केली. चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत "अविश्‍वास ठराव'ची चर्चा पोहोचवली गेली. त्यानंतर त्यांनी बदलाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो कशा पद्धतीने राबवता येईल, याची चाचपणी जिल्हा स्तरावर करा. कोण-कोण सोबत आहे, याची खातरजमा करण्याची सूचना केली. त्यामुळे आता जिल्हा पातळीवर बैठक होणार आहे. 

खासदार संजय पाटील, आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, माजी आमदार विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, राजेंद्रअण्णा देशमुख, पृथ्वीराज देशमुख, सदाभाऊ खोत यांच्यासह संग्रामसिंह देशमुख, सत्यजीत देशमुख, सम्राट महाडिक आणि भाजपचे प्रदेश पातळीवरील नेते मकरंद देशपांडे यांच्याशी बैठक होणार आहे. त्यात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, माजी मंत्री अजितराव घोरपडे हे भाजपसोबत असतील का, याची चाचपणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील पावले उचलली जाणार आहेत. 

भाजपचे बहुतांश नेते हे बदलासाठी अनुकुल असल्याचे सांगण्यात आले. इच्छुकांनी त्यांच्याकडे आग्रही भूमिका घेतली असून प्राजक्ता कोरे यांना संधी देताना सव्वा वर्षाने नव्याने पदाधिकारी निवड होईल, असा शब्द दिला होता. तो पाळावा लागेल, अशी भूमिका समोर आली आहे. त्यामुळे बदलाची पार्श्‍वभूमी सुरक्षित करून भाजप तसा निरोप प्रदेश पातळीवर देण्याची तयारी सुरु आहे. 

फडणवीसांचा निर्णय अंतिम 
जिल्ह्यातील नेत्यांनी चाचपणी करून तसा निर्णय प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे द्यायचा आहे. ते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलतील आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल, असे धोरण निश्‍चित झाले आहे. त्यामुळे बदलाबाबत आग्रही सदस्यांच्या आशा व्दिगुणित झाल्या आहेत.

संपादन : प्रफुल्ल सुतार