दिवाळीत भेसळीपासून सावधान!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

अगदी घरच्या घरी भेसळ ओखळण्याच्या काही सोप्या पद्धती...
सातारा - सणासुदीच्या काळात पदार्थांमध्ये भेसळ, तर भेसळयुक्त खव्यापासून मिठाई बनविण्याचा धोका असतो. त्यामुळे दिवाळीची खरेदी करताना नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्‍यक आहे. त्यासाठी घरच्या घरी भेसळ ओळखण्याच्या काही सोप्या पद्धती.

अगदी घरच्या घरी भेसळ ओखळण्याच्या काही सोप्या पद्धती...
सातारा - सणासुदीच्या काळात पदार्थांमध्ये भेसळ, तर भेसळयुक्त खव्यापासून मिठाई बनविण्याचा धोका असतो. त्यामुळे दिवाळीची खरेदी करताना नागरिकांनी सावधानता बाळगणे आवश्‍यक आहे. त्यासाठी घरच्या घरी भेसळ ओळखण्याच्या काही सोप्या पद्धती.

दुधाचा थेंब गुळगुळीत उतरत्या पृष्ठभागावर टाकल्यास पाणीमिश्रित दुधाचा थेंब लवकर ओघळतो. शुद्ध दुधाचा थेंब सावकाश ओघळतो. दुधात पिष्टमय पदार्थाची भेसळ (उदा : बटाटे, रताळी आदी) असल्यास त्यात आयोडिनचे थेंब टाकल्यास निळा रंग येतो. पिष्टमय पदार्थाची भेसळ ओळखण्यासाठी खवा व पाणी एकत्र उकळून घ्यावे. त्यात रवा, मैद्याची भेसळ असल्यास थंड झाल्यावर आयोडिनचे काही थेंब टाकल्यास निळा रंग येतो. 

पिष्टमय पदार्थांत भेसळ
एक चमचा वितळलेले तूप व एक चमचा तीव्र हायड्रोक्‍लोरिक ॲसिड एका परीक्षानळीत घ्यावे. त्यात थोडी साखर टाकून हे मिश्रण काही मिनिटे हलविल्यावर डालड्याची भेसळ असल्यास त्यास तांबडा रंग येतो. पिष्टमय पदार्थाची भेसळ असल्यास काही थेंब आयोडिन टाकल्यास लोण्याला प्रथम करडा रंग येतो. काही वेळात हा रंग निळ्या रंगात बदलतो. एका परीक्षानळीत एक चमचा खाद्य तेल व एक चमचा तीव्र नायट्रिक ॲसिड घेऊन हलविल्यास परीक्षानळीच्या खालच्या थरात लाल किंवा लालसर करडा रंग येतो. त्यावेळी त्यात धोतऱ्याची भेसळ असते.

पिठीसाखरेत खडू पावडर
पिठी साखरेत खडू पावडरची भेसळ होते. काचेच्या ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात अंदाजे  दहा ग्रॅम साखर टाकावी. मिश्रण हलविल्यानंतर खडूची भुकटी ग्लासच्या तळाशी बसते. त्यात धुण्याचा सोडा मिसळला असल्यास एका परीक्षानळीत थोडी पिठी साखर घेऊन त्यात काही थेंब हायड्रोक्‍लोरिक ॲसिड टाकल्यानंतर फेस व बुडबुडे येतात. मोहरीमध्ये आरजीमोन बी (पिवळा धोतरा) मिसळतात. त्याचा पृष्ठभाग खडबडीत तर मोहरीचा गुळगुळीत असतो. डाळीत लाख डाळ मिसळतात. लाख डाळ ही दिसण्यास चपटी व अनियमित आकाराची असते, त्यावरून ती ओळखावी. बेसन पीठातही लाख डाळीचे पीठ मिसळतात. गहा ग्रॅम बेसनात ५० मिली हायड्रोक्‍लोरिक ॲसिड मिसळावे. हे मिश्रण १५ मिनिटे उकळत्या पाण्यावर ठेवल्यानंतर गुलाबी रंग येतो. रवा, मैदा, आट्यामध्ये लोहकण असतात, त्यातून लोहचुंबक फिरविल्यास लोहकण चिटकून येतात.

काळ्या मिरीमध्ये पपईच्या बिया मिसळतात. या बिया आकसलेल्या व निमुळत्या असतात. त्यांचा रंगही फिकट असतो. कुटलेल्या मसाल्यात पिष्टमय पदार्थाची भेसळ असल्यास त्यात आयोडिन टाकल्यावर निळा रंग येतो.

हळदीत रंगीत लाकडाचा भुसा 
हळदीमध्ये रंगीत लाकडाचा भुसा मिसळतात. एका परीक्षानळीत एक चमचा हळद पावडर घेऊन त्यात तीव्र हायड्रोक्‍लोरिक ॲसिड टाकल्यास तत्काळ गुलाबी रंग येतो. या मिश्रणात पाणी टाकावे. हळद शुद्ध असल्यास रंग जातो. रंग न गेल्यास मेटॅलिक यलो रंग किंवा इतर कृत्रिम रंग मिसळल्याचे सिद्ध होते. मिरची पावडरमध्ये विटांची भुकटी/मीठ, लाल माती मिसळली जाते.

एक ग्लास पाण्यात एक चमचा मिरची पावडर टाकल्यास ग्लासच्या तळाशी साचलेला थर चिकट लागतो. हिंगामध्येही माती, हलका हिंग मिसळला जातो. शुद्ध हिंग पाण्यात टाकल्यास विरघळतो व पाणी दुधाप्रमाणे पांढरे होते. शुद्ध हिंग जाळल्यास ज्योत तेजस्वी दिसते.

मिठाईत ॲल्युमिनियमचा वर्ख...
मिठाईमध्ये कृत्रिम रंग, चांदीऐवजी अल्युमिनियमचा वर्ख वापरला जातो. मिठाईचा पदार्थ परीक्षानळीत घेऊन त्यात पाणी टाकून हलविल्यास पाण्याला रंग येतो. परीक्षानळीत वर्ख घ्या. यात पाणी टाका, थोडे हायड्रोक्‍लोरिक आम्ल टाका, द्रावणास दुधाळ रंग आल्यास तो अल्युमिनियम आहे हे स्पष्ट होते.

Web Title: Diwali Milk Sweet Mixing Alert