तिजोऱ्यांच्या चाव्या पुन्हा चोरांकडे नकोत- मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

झंझट नक्की संपवू
जिल्ह्यातील सिंचन योजनांची वीज बिले सरकारने द्यावीत अशी अपेक्षा खासदार संजय पाटील यांनी व्यक्त केली. त्याचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले,'' तुम्ही आला की वीज बिलांची सरकारला करावीच लागते. ही दरवेळची झंझट एकदाची आम्हाला संपवायचीच आहे. आचारसंहितेमुळे आता त्यावर बोलणार नाही मात्र आम्ही त्यावर नक्की मार्ग काढू. सोलर पॅनलद्वारे शेतीपंपान विज देण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून हा प्रकल्प केंद्र सरकारनेही स्विकारला आहे.''

सांगली : "स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे केंद्र व राज्य सरकारच्या तिजोऱ्यांच्या चाव्या आहेत. तुम्ही दिलेल्या तिजोरीतील कोट्यवधींचा निधी भाजप सरकार सर्वसामान्यांसाठी खर्च करीत आहे. मात्र तो पैसा थेट जनतेच्या हाती पडायचा असेल तर पुन्हा तिजोऱ्यांच्या चाव्या चोरांच्या हाती देऊ नका," असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कवलापूर (ता. मिरज) येथील जाहीर सभेत केले.]

कवलापूर विमानतळाच्या माळावर झालेल्या या जाहीर सभेसाठी जिल्हाभरातून भाजप कार्यकर्ते दाखल झाले होते. गेल्या काही दिवसांत विविध पक्षांतून भाजपमध्ये दाखल झालेल्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचे यानिमित्ताने शक्तीप्रदर्शन झाले. बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पणनराज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख माजी आमदार राजेंद्र देशमुख, रमेश शेंडगे, भगवानराव साळुंखे, दिपकबाबा शिंदे-म्हैसाळकर, दिनकर पाटील, विठ्ठल पाटील, डि.के.पाटील, गोपीचंद पडळकर, सुभाष पाटील, साहेबराव पाटील, शेखर इनामदार, मुन्ना कुरणे, गणेश गाडगीळ आदी नेत्यांनी व्यासपीठ व्यापले होते. चांदोली ते उमदी अशा जिल्ह्याच्या परिघाला व्यापणाऱ्या नेत्यांमुळे भाजपला आलेल्या बाळशाचे दर्शनच या निमित्ताने झाले.
विविध कल्याणकारी योजना सांगताना मुख्यमंत्र्यांनी आपल्या सरकारच्या कारभाराचा आढावाच जनतेसमोर मांडला. गेल्या अडीच वर्षातील सत्तेतून त्यांनी आधीच्या सरकारशी सतत तुलना केली.

ते म्हणाले, ''सत्तर हजार कोटी रुपये खर्चुनही आघाडी सरकारला पंधरा वर्षात एक टक्काही जमीन ओलिताखाली आणता आली नाही. मात्र आम्ही अडीच वर्षात नवे 13 लाख हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आणले. त्यात केवळ सांगली जिल्ह्यात 43 हजार हेक्‍टर इतके क्षेत्र आहे. जलयुक्त शिवार योजनेने आजवरच्या सरकारांनी निर्माण केलेला दुष्काळ हटवला. राज्य दुष्काळमुक्त गावांकडे जात ाहे.पुढील तीन वर्षात संपुर्ण ऊस क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आलेले असेल. इंदिरा आवास योजनेतून घरेच गायब करणाऱ्या कॉंग्रेस सरकारप्रमाणे आम्ही काम करणार नाही. जात-धर्म पाहता प्रत्येक गरीबाला घर हे आमचे ध्येय्य आहे.

केवळ यावर्षी नव्या अडीच लाख घरांचे निर्माण सुरु आहे. कॉंग्रेस सरकारने पंधरा वर्षात तरी एवढी घरे बांधली आहेत का? ईबीसी उत्पन्न मर्यादा आम्ही लाखावरून सहा लाखांवर नेली. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा देशात अठराव्या क्रमांकावर गेला होता तो यंदा तिसऱ्या क्रमांकावर आला. पुढच्या दोन वर्षात तो पहिला असेल. यंदा 68 हजार कोटींची परदेशी गुंतवणुक राज्यात झाली जी देशातील गुंतवणुकीच्या निम्मी आहे. महाराष्ट्राच्या जवळपासही अन्य राज्ये नाहीत. वर्षभरात 34 हजार गरीब रुग्णांवर शासनाने शंभर टक्के मोफत शस्त्रक्रिया झाल्या. अडीच वर्षातील सरकारची कामगिरी ही आजवरच्या सर्वच सरकारच्या तुलनेत अधिक पटीने आहे.''

ते म्हणाले, ''नोटाबंदीच्या निर्णयानंतर 14 हजार कोटींचा पैसा बॅंकामध्ये जमा झाला. त्यातला 40 टक्के पैसा काळा पैसा असल्याचे लक्षात आल्याचे नुकतेच अर्थसचिवांनी जाहीर केले आहे. हा सारा पैसा आता पंतप्रधान मोदी सर्वसामान्यांच्या योजनांसाठी खर्च करणार आहे. विनातारण उद्योगासाठी कर्ज देणारी मुद्रा योजनेची तरतुद दुप्पट केली आहे. शेतकऱ्यांसाठी दहा लाख कोटींच्या योजना सुरू होत आहेत. हा सारा पैसा ज्या यंत्रणाच्या माध्यमातून तुमच्या हाती येणार आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्था भाजपच्या हाती हव्यात. आजवर या चाव्या चोरांच्या हाती होत्या त्यामुळे हा पैसा त्यांच्या घरात गेला. त्यामुळे आता पुन्हा चोरांच्या हाती चाव्या देऊ नका. '
 

'त्या' बॅंका दिवाळखोरीत
मत म्हणजे जनतेने बॅंक रुपी पक्षांकडे विकासरुपी व्याजासाठी ठेवलेली ठेव आहे असे सूत्र मांडून मुख्यमंत्री म्हणाले,'' आमची भाजपची बॅंक साधी आहे मात्र त्यात मोदी-माझ्यासारखे चांगले सेवक आहेत. तर समोर कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या राहुल गांधी-पतंगरावांच्या बॅंका आहेत. त्यांची दारे पाट्या सोन्या चांदीच्या भुलवणाऱ्या आहेत मात्र तिकडे व्याजच काय ठेव रक्कमही परत मिळणार नाही. कारण त्या बॅंका आता दिवाळखोरीत निघाल्या आहेत.'' जिल्ह्यात भाजप कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या दिग्गजांसमोर लढत असल्याचा उल्लेख वक्‍त्यांनी केला होता.त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, '' ते सारे दिग्गज होते आता तो इतिहास जमा झाले; जनता त्यांना विसरून गेली.''

Web Title: do not let thieves take control again-